कोकणात ‘दौऱ्यांचं वादळ’ ; घेणं ना देणं, फुकटचीचं ‘कळवळ’ !

नुकसानीच्या पाहणी दौ-यासाठी आलेल्या राजकीय नेतेमंडळींचा 'राज्य विरूध्द केंद्र' असा रंगला संघर्ष

Goan Varta Live | प्रतिनिधी

सिंधुदुर्ग : दैव देतं अन कर्म नेतं, अशी म्हण आहे. त्याचाच दुहेरी प्रत्यय आज कोकणवासियांना आलाय. विधात्यानं अतोनात निसर्गसंपदा दिली, पण ग्लोबल वाॅर्मिंगसारख्या, माणसाच्या कर्मानं आलेल्या वादळानं ती हीरावून घेतली. आता या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधी आणि सत्ताधारीही आले, पण गलिच्छ राजकारणात आकंठ बुडालेल्या या राजकारण्यांनी कोकणवासियांना पुन्हा पुढच्या निवडणुकीपर्यंत वा-यावर सोडलंय, अशीच चर्चा आहे.

विरोधी पक्षाचं ‘जाळं’ अन मुख्यमंत्र्यांची ‘शाल जोडी’

नैसर्गीक आपत्ती आणि कोकण हे समीकरण नव्यानं सांगण्याची गरज नाही. निसर्ग कितीही कोपला तरी त्याला तोंड देण्यासाठी कोकणवासिय समर्थ असतात, आजही आहेत. मात्र मदतीच्या नावाखाली केवळ पर्यटन दौरे करून त्यांना कोणी मुर्ख ठरवण्याचा प्रयत्न केला तर ते कदापि सहन करणार नाहीत. असाच प्रकार सध्या घडलाय. तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा कोकण पाहणी दौरा होता. मात्र त्याच्याही अगोदर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोकणात ठाण मांडून बसले होते. दौरे जाहीर होणं, त्याच्या बातम्या येणं, प्रत्यक्षात विमानं, हेलिकाॅप्टर यांचं आगमन होणं, सायरनच्या आवाजानं आसमंत दणाणून जाणं, मिडियांच्या कॅमेऱ्यासमोर तकलादू पाहणी करणं आणि थातुरमातुर घोषणा करून कोकणवासियांच्या तोंडाला पानं पुसणं, हे सारे सोपस्कर पूर्ण झाले. प्रत्यक्षात कोकणवासियांना मिळालं काय? तर काहीच नाही. ज्या कोकणानं शिवसेनेला ताकद दिली, त्या कोकणाला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जास्तीजास्त मदत द्यावी, असं सांगुन विरोधी पक्षानं सत्ताधाऱ्यांसमोर जाळं पसरून ठेवलं. परंतु त्या जाळयात न अडकता, मुख्यमंत्री ठाकरे यांनी, कोकणला मदतीची जबाबदारी केंद्राकडंही असल्याची बतावणी करत विरोधकांना ‘ऑन दी स्पॉट’ शालजोडी दिली. एकीकडं अनेकांची घरं पडलीत, शेती वाहून गेलीय, बागा उध्वस्त झाल्या आहेत, आणि दुसरीकडं पाहणी दौ-यासाठी आलेल्या राजकीय नेतेमंडळींनी राज्य विरूध्द केंद्र असा तुफान विनोदी नाटयप्रयोग मिडीयासमोर लावलाय. आम्ही राजकारण करत नाही, असे सांगत, ते करण्याची साळसुदगिरी सारेच करतात. मात्र ज्यांचं छप्पर पडलंय, ज्याची बोट वाहुन गेलीय, ज्याला आजच्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे, ज्याची पोरं आज सकाळपासून उपाशी आहेत, त्यांचं आज या राजकीय नाटकानं निश्चितच पोटं भरलं नाही.

जेव्हा जनतेच्या मनातलं वादळ उठाव करेल..

पाहणी दौरे, पंचनामे, मदतीतला भ्रष्टाचार हे जुनंच होतं. त्यात आता हे नवं राजकीय नाटय फक्त मिडीयासाठी होतं. कोकणच्या पदरात पुन्हा धोधो पाऊस आणि घोंगावणारं वादळंच आहे. आधीच कोरोनानं कोकणचं नुकसान केलंय, त्यातच वादळानं कंबरडं मोडलंय. परंतु कोकणवासियांच्या या अश्रुंमध्येच डुंबत राजकीय जलक्रीडा करणा-या या राजकारण्यांना कोकणवासिय कधीही माफ करणार नाहीत. त्यांच्या मागंपुढं करत, सामान्य कोकणी जनतेच्या वेदनांचा लिलाव करणा-या कोकणातल्या बेगडी वाघांनाही याचे परिणाम आज ना उद्या भोगावेच लागतील. वादळानंतरच्या पाहणी दौ-यातलं हे घाणेरडं राजकीय वादळ जनतेच्या मनात साठलंय, ते जेव्हा उठाव करेल, तेव्हा मात्र हे सत्तांध आणि स्वार्थी राजकारणी स्वतःच्या आब्रुचीही भरपाई करू शकणार नाहीत, ही काळया दगडावरची रेष आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!