बुधवारपर्यंत मुसळधार; सतर्क राहण्याच्या नागरिकांना सूचना

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; राज्यात उद्या ‘रेड अलर्ट’

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र झाल्यामुळे येत्या बुधवारपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुधवारपर्यंत गोव्यासह संपूर्ण कोकणाला मुसळधार पावसाचा तडाखा बसेल असा अंदाज वर्तवत सोमवारी 14 जून रोजी रेड अलर्टही जारी केला आहे.

हेही वाचाः कवळेच्या शांतादुर्गा संस्थानच्या नावे संशयिताने लुबाडलं भाविकांना

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

मान्सून दाखल झाल्यानंतर 7 ते 9 जून या कालावधीत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा शुक्रवारपासून अधिक तीव्र झाला आहे. त्यामुळे तेथून गोवा, कोकणच्या दिशेने बाष्पयुक्त वारे वेगाने वाहत आहेत. रविवार आणि सोमवारी या वाऱ्याचा वेग ताशी 40 किमीपेक्षा अधिक राहील. त्यामुळे राज्यात मुसळधार पाऊस पडेल, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.

हेही वाचाः CURFEW | कर्फ्यू 21 जूनपर्यंत वाढवला

चार दिवसांत मुसळधार कायम

बुधवारपर्यंतच्या चार दिवसांत मुसळधार कायम राहील. काही भागांत 24 तासांत साडेचार ते पाच इंच पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे पूरसदृश्य परिस्थिती, झाडं कोसळून पडझड, वाहतुकीत अडथळे, पाणी, वीज पुरवठ्यात खंड, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, समुद्राला उधाण आदींसारख्या घटना घडू शकतात. याशिवाय महामार्गांकडेच्या दरडीही कोसळू शकतात. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी, अशा सूचना विभागाने केल्या आहेत.

समुद्राला उधाण येऊ शकतं

बुधवारपर्यंत अरबी समुद्रातही ताशी सुमारे 60 किमी वेगाने वारे वाहू शकतात. समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होऊन समुद्राला उधाण येऊ शकतं. त्यामुळे मच्छिमारांनी बुधवारपर्यंत मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

हेही वाचाः CORONA UPDATE | देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

गारठा वाढला

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांत पावसाची रिपरिप सुरूच आहे. काही ठिकाणी मध्यम, तर काही ठिकाणी तुरळक पाऊस कोसळत आहे. पावसामुळे हवेत गारवा पसरला असून, गोमंतकीय जनता थंडीचा अनुभव घेत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!