तुयेतील ‘ती’ घरं ९० वर्षानंतर आज होणार प्रकाशमान

मांद्रेतील काँग्रेसचे युवा नेते सचिन परबांनी धनगर वस्तीतील कुटुंबांना दिली सोलारच्या दिव्यांची मदत

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणे: केंद्र सरकार आणि राज्य सरकार वारंवार ‘सबका विकास’ असं सांगतात. परंतु तुयेतील धनगर वस्ती आजही अंधारात आहे. हे खोटं नसून ही वस्तुस्थिती आहे. गोवा मुक्त होऊन ६० वर्षं झाली, तरीही राज्यातील काही भागात अजून वीज, रस्ता, पाण्याची सोय नाही, हे कुणाला सांगितल्यास खरं वाटणार नाही. आपल्या आजुबाजुला असं चित्र जेव्हा दिसतं, तेव्हा कुठेतरी माणुसकी हरवल्याचा भास होतो. मात्र ‘जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे’ या ओळींप्रमाणे देवाच्या रूपाने म्हणा, किंवा देवदूत म्हणून, मांद्रेतील काँग्रेसचे युवा नेते सचिन परब या धनगर वस्तीतील चारही कुटुंबाच्या मदतीसाठी धावून आले आहेत. परबांच्या प्रयत्नातून या 4 घरांमध्ये आज 90 वर्षांनंतर आज संध्याकाळी ४ वा. सोलारचे दिवे पेटणार आहेत.

हेही वाचाः ACCIDENT | काणकोण गुळे येथे १४ गुरांचा मृत्यू

ती 4 कुटुंबे अजूनही दुर्लक्षित

तुये येथील रैना मैदानाच्या मागच्या बाजूला ९० वर्षांपासून अधिक काळ धनगर समाजातील कुटुंब झोपडी बांधून आपला संसार चालवताहेत. त्यांना ना वीज मिळालीये, ना पाणी, ना रस्ता. त्यात भर म्हणजे उन्हाळ्यात सुकलेल्या गवताला कुणीतरी आग लावतं आणि मग हा हा म्हणता वणवा पेटतो. आपल्या झोपड्या हा वणव्यात जळून खाक होऊ नये म्हणून ही मंडळी झोपड्यांच्या आजुबाजुला असलेलं गवत काढून आग झोपड्यांपर्यंत येणार नाही याची काळजी घेतात. सरकारचं या भागाकडे लक्ष नाही. गोवा मुक्तीला 60 वर्षं होऊनही सरकारने या भागात मुलभूत सुविधा पुरवलेल्या नाहीत, ही खेदाची बाब आहे.

आजपर्यंत कार्यवाही झाली नाही

मागच्या वर्षी या चारही कुटुंबांना सरकारकडून वीज, पाणी आणि रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी पेडणेचे उपजिल्हाधिकारी रविशेखर निपाणीकर यांच्यामार्फत सरकारला अर्ज सादर केला होता. मात्र आजपर्यंत त्याची कार्यवाही झालेली नाही याची खंत आहे, असं तुयेचे माजी सरपंच निलेश कांदोळकर म्हणाले.

हेही वाचाः अधिवेशनात ‘गोवा फॉरवर्ड’ ‘काँग्रेस’सोबत: विजय

राजकीय लाभ नसल्यानं हा भाग दुर्लक्षित

या भागात मोठा राजकीय लाभ नसल्यानं हा भाग राज्यकर्ते दुर्लक्ष करत असल्याचा दावा माजी पंच उदय मांद्रेकर यांनी केला. जर या भागातून २०० ते ३०० मतं मिळाली असती, तर मुलभूत सोयी-सुविधा या भागातही अगदी सहज पोचल्या असल्या. गोवा मुक्त होऊन ६० वर्षं झाली तरीही राज्यात असे अनेक भाग आहेत, जे मुलभूत गरजांपासून वंचित आहेत. यावरून आतापर्यंत निवडून आलेल्या आमदार मंत्र्यांचं अपयश दिसतं. त्यामुळे जागुत नागरिक मतदारांनी येत्या निवडणुकीत परीवर्तन घडवून आणण्यासाठी योग्य विचार करून आमदार निवडावा, असं आवाहन मांद्रेकरांनी केलं.

सुखाची झोप लागणार

९० वर्षांनंतर आज या घरात दिवे पेटणार याचा आनंद मोठा आहे. आज खऱ्या अर्थाने मला सुखाची झोप लागणार आहे. एखाद्याला मदत केली आणि त्यांना त्यातून आनंद मिळाला म्हणजेच मदत करणारा भरून पावतो, असं सचिन परब म्हणाले.

हा व्हिडिओ पहाः Video | Rajendra Arlekar | राज्यपाल झाल्यानंतर पहिल्यांदाच गोव्यात

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!