तीन महिन्यांत खनिज व्यवसाय सुरू करणार : मुख्यमंत्री

मये मतदारसंघासाठी २०९ कोटींच्या योजना

विशांत वझे | प्रतिनिधी

डिचोलीः मये मतदारसंघाच्या विकासासाठी २०९ कोटी रुपयांच्या योजनांना चालना देण्यात येत आहे. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात कोविड, वादळ, पूर आदी संकटे आली, मात्र विकासाची गती कुठेच मंदावली नाही. तीन महिन्यांत खाणी सुरू करणं, मये प्रश्नी असलेल्या त्रुटी दूर करून उपजिल्हाधिकारी कार्यालयात प्रक्रिया सुरू करणं, तसंच मतदारसंघातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. मये मतदारसंघ दौऱ्यात त्यांनी विविध कामांचा शुभारंभ केला. यावेळी ते बोलत होते.

हेही वाचाः राणे पुन्हा मैदानात ; यात्रेवर प्रशासनाची करडी नजर

शिरगाव पंचायत क्षेत्रातून मये मतदारसंघाचा दौरा केला सुरू

मुख्यमंत्र्यांचा मये मतदारसंघ दौरा गुरुवारी शिरगाव पंचायत क्षेत्रातून सुरू झाला. सकाळी त्यांनी ग्रामदैवत श्री लईराई मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतलं. त्यानंतर देवस्थान सभागृहात मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. या दौऱ्यात त्यांच्यासोबत आमदार प्रवीण झाट्ये, जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर, महेश सावंत, भाजप मंडळाचे अध्यक्ष दयानंद कारबोटकर, प्रभारी प्रेमानंद म्हांबरे, सुलक्षणा सावंत, सरपंच, पंच आदी मान्यवर उपस्थित होते.

गोवा आत्मनिर्भर बनवणं हे माझं स्वप्न

मुख्यमंत्री म्हणाले की, साठाव्या मुक्तीदिनाच्या वर्षी ‘स्वयंपूर्ण गोवा, आत्मनिर्भर गोवा’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवणं हे माझं स्वप्न आहे. त्यासाठी पंच, कार्यकर्त्यांनी सहकार्य करावं. मोफत पाणी, वीज सवलत ही आमच्या सरकारची भावना आहे. वीस वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम खाते सांभाळणारा मंत्री काहीच करू शकला नव्हता. आज तोच म्हणतो, मोफत पाणी देण्याची योजना माझीच होती. ही निव्वळ धूळफेक आहे. 

हेही वाचाः शोध सुरु! या २४ वर्षीय बेपत्ता तरुणाला कुठेही पाहिलंत तर कळवा

मयेत विकासाला चालना देण्यासाठी साधनसुविधा आवश्यक

आमदार प्रवीण झाट्ये म्हणाले की, मयेत विकासाला चालना देण्यासाठी साधनसुविधा आवश्यक आहेत. मतदारसंघातील विकास योजनांचा त्यांनी आढावा घेतला. ग्रामस्थांनी शेती, वीज, पाणी, नोकरी, खाण आदींबाबत गाऱ्हाणी मांडली. मुख्यमंत्र्यांनी तेथे उपस्थित अधिकाऱ्यांना तातडीने प्रश्न सोडवण्यास सांगितले. मयेतील १०० जणांना सनदा मंजूर झाल्या आहेत. त्यांतील पाच जणांना त्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आल्या. मयेत चार कोटी रुपये खर्चून जलवाहिनी घालण्याच्या कामाची पायाभरणी करण्यात आली. चोडण, पिळगाव आदी ठिकाणी विकास योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. सर्व पंचायत विभागांत त्यांनी जनतेशी संवाद साधला.

हेही वाचाः Afghanistan crisis: काबुल एअरपोर्टवर इटलीच्या विमानावर फायरिंग

रात्री उशिरा कारापूर येथे दौऱ्याचा समारोप

यावेळी मये नागरिक भूविमोचन समितीचे पेडणेकर, कालिदास कवळेकर, राजेश कळंगुटकर आदींनी निवेदन सादर केले. सर्व सरपंच, पंच, कार्यकर्ते या दौऱ्यात उपस्थित होते. ठिकठिकाणी सुवासिनींनी औक्षण करून मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. शिरगाव, मये, नार्वे, चोडण, वन मावळिंगे, सर्वण, कारापूर, कुडचिरे, पिळगाव या पंचयतींचा मुख्यमंत्र्यानी दौरा केला. रात्री उशिरा कारापूर येथे दौऱ्याचा समारोप झाला.

हा व्हिडिओ पहाः Accident | Sad | हृदयद्रावक! पहिल्या वाढदिवशीच चिमुकल्याचा मृत्यू

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!