दिल्लीत उभारणार कोंकणी अकादमी

कोंकणी भाषा-संस्कृतीला देणार चालना

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्ली मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत दिल्ली सरकारने कोंकणी भाषा व संस्कृतीच्या वाढीसाठी व राष्ट्रीय राजधानीत कोंकणीची वाढ होण्यासाठी कोंकणी अकादमी स्थापन करण्यास मान्यता दिली. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या नेतृत्वाखाली कला, संस्कृती आणि भाषा विभाग कोंकणी अकादमी अंतर्गत विविध पुरस्कार, उत्सव आणि भाषा अभ्यासक्रम सुरू करणार आहे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या नेतृत्वात दिल्ली सरकारच्या कला, संस्कृती आणि भाषा विभागांतर्गत दिल्लीतील लोकांना समृद्ध कोंकणी संस्कृती, साहित्य, भाषा आणि लोककला या सर्वांशी जवळीक साधण्यासाठी अकादमीची स्थापना केली जाईल. नव्याने तयार झालेल्या अकादमीला लवकरच आवश्यक त्या पायाभूत सुविधांसह कार्यालयासाठी जागा देण्यात येणार आहे.

सिसोदिया म्हणाले की, प्रत्येक भारतीयांच्या हृदयात गोव्याचे विशिष्ट स्थान आहे. दिल्ली सरकारची कोंकणी अकादमी राजधानीत कोंकणी संस्कृतीची सर्वोत्कृष्ट ओळख करून देईल .

दिल्ली : देशातील विविध संस्कृतींचे एकत्रीकरण

2019 मध्ये दिल्ली सरकारने कला, संस्कृती आणि भाषा विभागांतर्गत 14 नवीन भाषा अकादमी स्थापन केल्या. देशाची राजधानी म्हणून, दिल्ली ही देशातील विविध संस्कृतींचे एकत्रीकरण आहे. भाषा अकादमीचा उद्देश केवळ त्या भाषेचे फक्त भाषण कार्यक्रम करणेच नव्हे, तर विस्तृत प्रेक्षकांपर्यंत ती पोहोचवणे हे देखील आहे. म्हणूनच, दिल्लीत राहणाऱ्या व विशिष्ट भाषा बोलणाऱ्यांची संख्या कितीही असली तरी सांस्कृतिक विविधता विकसित करण्याची ही संधी आहे. लोकांच्या संस्कृतीचा आदर करून सन्मान, आपुलकी आणि ओळख इत्यादीची भावना प्रदान करणे, ही आपली जबाबदारी आहे.

तामिळ अकादमीची यापूर्वीच अधिसूचना

पहिल्या टप्प्यात बर्‍याच भाषांचा समावेश करण्यात आला होता, तर यापुढील काळात काही महत्त्वाच्या भाषा समाविष्ट केल्या जातील. कोंकणी हा भारताच्या सांस्कृतिक इतिहासाचा एक अतिशय रंजक आणि गतिशील भाग आहे. तामिळ संस्कृती आणि भाषेला चालना देण्यासाठी अलीकडेच तामिळ अकादमीची अधिसूचना काढण्यात आली आणि दिल्ली सरकारने त्याची स्थापना केली.

नवीन अकादमीतर्फे विविध पुरस्कार

दिल्ली सरकारच्या कला, संस्कृती आणि भाषा विभागाने हा निर्णय घेतला आहे की कोंकणी भाषा आणि संस्कृतीतील लोकांच्या चांगल्या कार्याचा गौरव करण्यासाठी नवीन अकादमी विविध पुरस्कार देईल. या अकादमीच्या माध्यमातून सरकार भाषेचे अभ्यासक्रम देखील घेईल. कोंकणी भाषकांसाठी दिल्ली सरकार सांस्कृतिक उत्सवाचे आयोजन करणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!