‘लाडली लक्ष्मी’ योजनेतील दुरुस्त्यांच्या विरोधात टीएमसीने घेतली कठोर भूमिका….

पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत सरकारकडे मागणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : लाडली लक्ष्मी’ योजनेंतर्गत प्रलंबित अर्जांचा डेटा जाहीर करावा तसेच लाभार्थ्यांना प्रलंबित आर्थिक मदत मिळेल याची खात्री करण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी गोवा तृणमूल काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.

पत्रकार परिषदेस पदाधिकारी उपस्थित

टीएमसीच्यावतीने सोमवारी पणजीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी महिला विभागाच्या अध्यक्षा आणि सरचिटणीस अविता बांदोडकर, सरचिटणीस प्रतिभा बोरकर यांच्यासह प्रवक्त्या अना ग्रेसियास यावेळी उपस्थित होत्या.

पर्रीकरांच्या कार्यकाळात योजना सुरू

लाडली लक्ष्मी योजनेतील नुकत्याच झालेल्या दुरुस्त्यांबद्दल बोलताना अविता बांदोडकर म्हणाल्या, ‘मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात तरुण मुलींना शिक्षण, व्यवसाय किंवा विवाह हेतूसाठी, आर्थिक सहाय्य देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. महिलांच्या विकासावर, शिक्षण आणि उद्योजकता यांसारख्या महत्त्वपूर्ण घटकांना वगळल्यास मर्यादा येतात. एखाद्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणारा कालावधी कमी करून सरकारने पात्रतेचे निकष कमी केले आहेत. ‘अविवाहित अर्जदारांनी सादर केलेले पूर्वीचे पात्र अर्ज त्यांनी नागरी विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच मंजूर केले जातील. एखादी महिला उच्च शिक्षण घेण्यासाठी किंवा स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी सदर निधी का वापरू शकत नाही?’ असा सवाल त्यांनी महिलांची व्यथा व्यक्त करताना केला.

सरकार लोकांच्या विश्वासाची थट्टा करतंय

भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या निवडणुकीतील पोकळ आश्वासने उघड करताना बांदोडकर म्हणाल्या, ‘निवडणुकीदरम्यान भाजप सरकारने या योजनेचा प्रत्येक गोवेकराला फायदा होईल, असे आश्वासन दिले होते. आता निवडणुकीचा टप्पा संपला असून, भाजप सरकार एकामागून एक सर्व आश्वासनांवर यू-टर्न घेत आहे. भाजप सरकार लोकांच्या विश्वासाची थट्टा करत आहे. त्यांनी लाडली लक्ष्मीच्या सर्व प्रलंबित अर्जांचा डेटा जाहीर केला पाहिजे, जेणेकरून लोकांना योजनेची स्थिती आणि यश किती आहे ते कळेल.’

गृहलक्ष्मी’ योजनेद्वारे महिलांना सक्षम बनवणार

महिला सक्षमीकरणाबाबत पक्षाच्या संकल्पाचा पुनरुच्चार करताना बांदोडकर म्हणाल्या , या सुधारणांमुळे महिला सक्षमीकरणावर मर्यादा आल्या आहेत आणि भाजप सरकार गोमंतकीयांना मूर्ख बनवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पश्चिम बंगालमधील १.८ कोटींहून अधिक महिलांना टीएमसीच्या ‘लक्ष्मी भंडार’ योजनेद्वारे सक्षम बनवल्याबद्दल ममता बॅनर्जी यांना नुकताच ‘स्कॉच ‘ पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार म्हणजे टीएमसीने दिलेली आश्वासने पूर्ण केल्याचा दाखला आहे. त्या पुढे म्हणाल्या, ‘आम्ही गोव्यात राहण्यासाठी आलो आहोत आणि आम्ही आमचे सरकार स्थापन केल्यावर ‘गृहलक्ष्मी’ योजनेद्वारे महिलांना सक्षम बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू.’

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!