टीटोजच्या नावाखालील #टिवटिवाट

नरेंद्र सावईकर: कोणा एकट्यामुळे गोव्यात पर्यटन अस्तित्वात आहे हा गैरसमज

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः इथला निसर्ग आणि इतर पर्यटनपूरक घटकांमुळे गोव्यात पर्यटन अस्तित्वात आहे. कोणा एकट्यामुळे गोव्यात पर्यटन अस्तित्वात आहे हा गैरसमज आहे. जर कोण आपला व्यवसाय बंद करत असेल तर तो त्याच्या निर्णय आहे. सिस्टमला दोष देणं हे सर्वथा चुकीचं, अशी प्रतिक्रिया भाजपचे माजी खासदार नरेंद्र सावईकरांनी दिली. टीटोज क्लबच्या विक्री प्रकरणावर भाष्य करताना सावईकर म्हणाले. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी हे भाष्य केलंय.

सोशल मीडियावर पोस्ट करत नरेंद्र सावईकरांनी लिहिलंय,

उत्तर गोव्यातील एका नाईट क्लबच्या मालकाने तो बंद करत असल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केलं. ते करताना आपल्या वाट्याची पूर्ण भरपाई आपल्याला मिळाल्याचंही त्याने म्हटलं आहे. पण सरतेशेवटी प्रशासन, त्यातील अधिकारी आणि इतरांच्या जाचाला आपण कंटाळल्याचंही त्याने म्हटलंय.

१९७१ साली स्थापन झालेल्या या क्लबमुळे त्या भागातील पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्यांना निश्चितच फायदा झाला असणार. गेली ५० वर्षं सदर क्लबने सर्व कायदे पाळून (काहीवेळा वाकवूनही) आणि वेळोवेळी सरकारी अधिकारी तसंच जनप्रतिनिधींचं सहकार्य घेतलं असणार, असं मानल्यास काही चुकीचं ठरणार नाही. सदर क्लबच्या अधिकृत वेबसाईटवरील माहितीप्रमाणे क्लबमध्ये ८७६०० तास संगीत वाजवण्यात आलं, १६४२५ पार्ट्या झाल्या आणि महिन्याला ९०००० पर्यटक भेट देत होते. जम बसण्यासाठी सुरुवातीची १० वर्षं जरी सोडली, तरी गेली किमान ४० वर्षं सरासरी ५०००० च पर्यटक सदर क्लबला भेट देत होते असं गृहीत धरू.

या सर्वाची आर्थिक गोळबेरीज आणि हिशेब यांचा अभ्यास ज्यांना करायचा आहे, त्यांनी तो खुशाल करावा आणि त्यातील अर्थकारण समजून घ्यावं. मुद्दा हा आहे, की एखादा व्यवहार बंद करताना किंवा सोडताना यंत्रणेला दोष का द्यायचा? व्यवहार सुरू करताना आणि चालवताना हीच यंत्रणा होती. वेळप्रसंगी त्यांचं सहकार्यही घेतलं असणार. आता हा दोषारोप का? हे म्हणजे दुसऱ्याकडे बोट दाखवून आपलं निरपराधित्व सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यासारखं आहे.

सदर क्लबसारख्या क्लबमध्ये ज्याची ऐपत आहे असाच देशी आणि परदेशी ग्राहक जाणार आणि सामान्य गोंयकाराचा संबंध मात्र पर्यटन व्यवसायाशी निगडित व्यवहारापुरताच असणार. विकायचा किंवा सोडायचाच होता तर मुकाट्याने व्यवहार करून बाजूला व्हायचं. तो टिवटिवाट कशासाठी? दोषारोप करून सवंग प्रसिद्धीसाठी? की नवीन व्यस्थापनेच्या ओळखीसाठी आणि त्यांचा जम बसवण्यासाठी?

क्लब ही काही गोव्याची खरी ओळख नाही. गोव्यामुळे आणि गोवा नावामुळे सदर क्लबला ओळख मिळाली हे त्यातील खरं वास्तव आहे. एक क्लब दुसऱ्या व्यवस्थापनेने विकत घेतला किंवा चालवायला घेतला म्हणून काही सांगेतील बुडबुड्यांच्या तळीतील बुडबुडे बंद होणार नाहीत किंवा कुळ्याचा दूधसागर आटणार नाही. गोव्यातील अण्णाची पाव-भाजी, सुरेशचे सामोसे, सूर्यकांतच्या हॉटेलमधील गरम मिरची, कमलाकांतच्या गाड्यावरील भजी ही गोव्याची खरी ओळख आहे. अंत्रुज महालातील देवळे, पावसाळ्यात वेर्ले-साळजीणी येथील ओला चिंब निसर्ग, मासे आणि मांसाहारी खवय्यासाठीची वेगवेगळी ठिकाणे हा खरा गोवा आहे आणि हे गोव्याच्या पर्यटनाचे महत्त्वपूर्ण मानबिंदू आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!