Tito’sचे मालक रिकार्डो डिसोझांनी भाजप हायकमांडसमोर वाचला व्यथांचा पाढा?

दिल्लीत भाजप मुख्यालयातील भेटीमुळे तर्क वितर्कांना उधाण

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : रिकार्डो डिसोझा हे नावं गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चेत आलं होतं. टिटोजचे मालक म्हणून प्रसिद्ध असलेले रिकार्डो डिसोझा यांनी दिल्लीत जाऊन भाजपच्या हायकमांडची भेट घेतल्याचं खात्रीलायक वृत्त हाती येतंय. त्यांच्या दिल्ली भेटीमुळे चर्चांना उधाण आलंय. फेसबूकवर पोस्ट करत टिटोज विकल्याची घोषणा करताना रिकार्डो डिसोझा यांनी सनसनाटी आरोप करत खळबळ उडवून दिली होती. आता दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात जाऊन त्यांनी काही वरिष्ठांच्या गाठीभेटी घेतल्यात. या गाठीभेटींमध्ये आपल्या व्यथा आणि दुःख मांडण्याची संधी त्यांना मिळाल्याचं कळतंय. त्यामुळे ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते आहे.

भेटीचं खरं कारण?

रिकार्डो डिसोझा यांनी गुरुवारी दिल्लीत भाजप हायकमांडशी चर्चा केल्याचं सूत्रांनी सांगितलंय. भाजपचेच दिल्लीत एक वरीष्ठ नेते आणि रिकार्डा यांचे मित्र असलेल्या व्यक्तीनं ही भेट घडवून आणली. या भेटीनं राज्याच्या राजकारणातही तर्क वितर्कांना उधाण आलंय. सुरुवातील रिकार्डो डिसोझा हे टिटो विकून भाजपात प्रवेश करणार की काय, अशीही कुजबूज ऐकू येऊ लागली होती. मात्र या भेटीचं खरं कारण हे वेगळंच असल्याचं कळतंय.

गंभीर आरोप

गोव्यातील पर्यटन व्यवसायाशी संबंधित उद्योजकांना स्थानिक राजकीय नेते, काही प्रशासकीय अधिकारी जाच करत असल्याचा सनसनाटी आरोप रिकार्डो यांनी टिटो विकताना केला होता. त्यांच्या या आरोपांनी खळबळ उडवून दिली होती. अखेर या आरोपांबाबत त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याचं कळतंय. या चर्चेत काही राजकीय व्यक्तींवर आरोपही करण्यात आले नसणार, असं होऊच शकत नाही. त्यामुळे नेमक्या कोणत्या राजकीय व्यक्तींची नावं या सर्व आरोपांशी जोडली गेलेली आहेत? कुणाच्या दबावामुळे रिकार्डो डिसोझा यांना आपला सगळा गोव्यातील व्यवसाय विकण्याची वेळ आली? याबाबतही तर्क वितर्क लढवले जात आहे. 28 जूनला सोशल मीडियात पोस्ट टाकत टिटोज बंद करत असल्याची घोषणा रिकार्डो डिसोझा यांनी केली होती.

२८ जूनला घोषणा

गोव्यातील प्रसिद्ध क्लब टिटोचा सर्व उद्योग विकला असल्याची घोषणा गोमंतकीय उद्योजक रिकार्डो जोजेफ डिसोजा ‘रिकी’ यांनी २८ जूनला केली होती. गोव्यात कुठलाच उद्योग सुरू करणार नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं होतं. सतावणूक करणारे अधिकारी, पोलीस, पीडीए, सीआरझेड, एनजीओ, पंचायतींमुळे हा निर्णय घेण्यास आपण भाग पडलो असल्याचं म्हणत या सर्वांवर त्यांनी आरोप केले होतं.

सरकारी अधिकारी, पोलिसांच्या हप्तेखोरीत व्यवसाय करणंच कठीण बनत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे. यात गोमंतकीय उद्योजक बळी पडत असून परप्रांतिय उद्योजकांकडून हे चोचले पुरवले जात असल्यानं सरकारी अधिकारी, पोलिस स्थानिक उद्योजकांनाच टार्गेट करत असल्याची भावना येथील लोकांची बनल्याचा सनसनाटी आरोप डिसोझा यांनी केला होता. दरम्यान, आता डिसोझा यांच्या दिल्ली भेटीनं काही राजकीय नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकल्याची चर्चा जोर धरतेय. आता राजधानी दिल्लीतून भाजप टिटोजच्या मालकांच्या मदतीसाठी काय करतं, हे पाहणं महत्त्वाचंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!