तिळारी तुडुंब ; दोडामार्गात अनेक गावांचा संपर्क तुटला !

जुन्या आठवणींनी नागरिकांच्या उरात धडकी !

संदिप देसाई | प्रतिनिधी

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात आज दिवसभर पावसाची संततधार सुरूच असल्याने नदीनाल्यांना पूर आला आहे. तालुक्यातील अत्यंत महत्वाची तिलारी नदीही तुडुंब भरून वाहू लागल्याने नदीकाठच्या लोकांच्या उरात एकच धडकी भरली आहे. मात्र तिलारी धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असली तरी धरणातून बाहेर पडणारा पाणीसाठा मर्यादेत असल्याने नागरिकांनी घाबरण्याची आवश्यकता नाही, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केलं आहे.

तिलारी नदीपात्र ओसंडून वाहत असल्याने नागरिकांना जुन्या आठवणींचा उजाळा होत असल्याने भीती कायम आहे. शिवाय बाकी सगळीकडे पाऊस कोसळत असल्याने तालुक्यातील बहुतांश नदीवरील पूल व कॉजवे पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

सायंकाळी उशिरा तीलारीचे कार्यकारी अभियंता कोरे यांच्याशी संपर्क साधला असता तिलारी धरण सद्यस्थितीत ८३ टक्के भरले असले तरी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग २८० ते ते २९० इतकाच होत असल्याने नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हयात अन्य ठिकाणी धो धो पाऊस झाला असला तरी बुधवारी तीलारीत ७४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. तर गुरुवारी मात्र पावसाने वेग वाढवला होता. तरीही तिलारी नदी धोका पातळीच्या जवळपास दीड मीटर कमी उंचीने वाहत असल्याची माहिती कोरे यांनी दिली.

तालुक्यात सर्वत्रच धुवांधार पाऊस आहे. तेरवण मेढे, खरारी नाला, घोडगेवाडी, मांगेली, भेडशी या नद्यांचे पाणी तीलारीला मिळत असल्याने नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढतो आहे, असेही ते म्हणाले. साटेली भेडशीत मात्र तीलारीने पात्र ओलांडून शेतकऱ्यांच्या शेती बागायतींचे नुकसान केले आहे. भिकाजी गणपत्ये व अन्य शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे.

शिवाय तिलारी धरणाच्या सॅडल डॅमचे चारही दरवाजे पुर्णतः उघडे असल्याने धरणातून अजून पाणी सोडण्याचा प्रश्न उदभवत नाही. गेल्या पाच वर्षांचा पावसाचा अभ्यास करता २० ऑगस्टपर्यंत धरणाचे दरवाजे उघडेच राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे जरी तालुक्यात पूरस्थिती असली तरी ती धोकादायक अशी नसल्याचा दुजोरा तीलारीच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.

तिलारी धरण वगळता तालुक्यात सर्वच ठिकाणी पावसाची संततधार कायम असल्याने गावोगावी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तिलारी नदीवरील व अन्य नदी ओहळ या मार्गांवरील पूल कॉजवे पाण्याखाली गेले आहेत. घोडगे परमे, मूळस – हेवाळे, भेडशी, खोकरल, पिकुळे, दोडामार्ग शहरातील म्हावलंकरवाडी हे पूल पाण्याखाली गेले आहेत. दोडामार्ग आपत्ती विभाग तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांची टीम तालुक्यातील पूर स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!