तिळारीचा कालवा फुटला! राज्याच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम जाणवण्याची शक्यता

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो : तिळारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या उजव्या कालव्याला सोमवारी दुपारी भगदाड पडलं. हा कालवा फुटल्याने आजूबाजूचा परिसर जलमय झाला होता. तर साटेली भेडशी आवाडे भागात एकच गोंधळ उडाला होता. सिंधुदुर्ग आणि गोवा राज्याला पाणीपुरवठा करणारा हा कालवा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेलं. तसंच रस्ते जलमय झाल्याचं पाहायला मिळालं. तसंच कालव्यातून बाहेर आलेलं पाणी शेती आणि बागायतीत शिरल्यानं मोठं नुकसान झालंय. याचा फटका स्थानिक शेतकऱ्यांना बसणार आहे. गेल्या काही वर्षांत सातत्याने तिळारीचे कालवे फुटू लागल्याने ठेकेदारांसाठी कुरण ठरलेल्या तिळारीचा बोगस कारभार चव्हाट्यावर येऊ लागलाय.
रस्त्यावर पाणी

साटेली-भेडशी खानयाळेत तिलारीचा डावा कालवा फुटल्याने दोडामार्ग तिलारी राज्यमार्गावर आवाडे येथे पाण्याचा मोठा प्रवाह आला होता. त्यामुळे वाहतूक बंद असून शेकडो वाहने दोन्ही बाजूला अडकलीत. तर याच भागात असणाऱ्या गावकऱ्यांना आपली घरंही पाण्याखाली जातील, अशी भीती वाटू लागली आहे.

गोव्यावरही परिणाम
गेल्या काही महिन्यांत तिळारी प्रकल्पाचे कालवे सातत्यानं फुटण्याच्या घटना समोर आल्या आहेत. यावेळी कालवा फुटल्यानं गोवा राज्याच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. आधीच जानेवारी महिन्यातच राज्यात पाणीटंचाई भासू लागली आहे. अशातच आता कालवा फुटल्यानं राज्याच्या पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाल्यास लोकांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागणार आहे.
तिळारी कालव्यातून एकूण पाण्याच्या जवळपास ७० टक्के पाणीपुरवठा राज्याला मिळायला हवा. मात्र आता तो होत नसल्यानं आधीच सवाल उपस्थित केले जात होते. अशातच आता पुन्हा कालवा फुटल्यानं पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यताय. उत्तर गोव्यात बार्देश, पेडणे आणि डिचोलीमध्ये तिळारीतून पाणी पुरवठा केला जातो. या भागांना फटका बसण्याची चिन्ह आहेत. तिळारीच्या पाण्यावर दोन पाणी प्रक्रिया प्रकल्प अवलंबून आहेत. या प्रकल्पांवरही कालवा फुटल्याचा परिणाम होणार आहे.
आता फुटलेला कालवा पुन्हा बांधण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे. मोठं भगदाड कालव्याला पडल्यानं हा कालवा दुरुस्त कसा केला जाणार, हाही प्रश्न यानिमित्तानं उपस्थित केला जातोय.
हेही वाचा – पाटबंधारे विभागाला कधी जाग येणार? 15 दिवसांपासून पाण्याची नासाडी
ग्रामस्थांमध्ये भीती
