#BUDGET 2021 : तिळारीचं पाणी आणण्यासाठी पाईपलाईन!

मुख्यमंत्र्यांकडून 122 कोटींची घोषणा

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : दोडामार्ग तालुक्यातील तिळारी धरणातून अखंडित पाणी पुरवठ्यासाठी 23 किमी.ची पाईपलाईन उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अर्थसंकल्पातून केली. त्यासाठी 122 कोटींची तरतूद केली असून महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या अधिकार्‍यांच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.

कालवे फुटत असल्यानं निर्णय…

गोवा आणि महाराष्ट्राचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिळारी प्रकल्पाला तीस वर्षं होत आली, तरी अजूनही गोव्याला तिळारी धरणाचं पाणी नियमित मिळत नाही. महाराष्ट्र हद्दीत कालवे फुटून पाणीपुरवठा खंडित होण्याच्या घटना वारंवार घडताहेत. या पार्श्वभूमीवर कोलवाळ येथील तिळारी विश्रामगृहात गोवा आणि महाराष्ट्र सरकारच्या तिळारी प्रकल्प स्टँडिंग कमिटीची संयुक्त बैठक झाली होती. तिळारी धरण ते गोवा हद्द या दरम्यान 23 किलोमीटरची पाईपलाईन घालून प्रश्न निकालात काढण्याचा निर्णय घेण्यात आला हाता. दोन्ही राज्यांतील अधिकार्‍यांनी हा प्रस्ताव मंजूर केला होता.

नियमित पाणी मिळण्यासाठी प्रयत्न…

या बैठकीला कोकण जलस्रोत विकास महामंडळाचे मुख्य अभियंता संतोष तिरमानवर, गोव्याच्या जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता श्रीकांत पाटील आणि इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत गोव्याकडून तिळारी धरणाचं पाणी नियमित न मिळणं, वारंवार कालवे फुटून पाणी वाया जाणं, शेतीचं नुकसान, पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होणं आदी समस्या मांडण्यात आल्या होत्या. महाराष्ट्राच्या अधिकारीवर्गाने यापुढे काळजी घेण्याची हमी दिली होती. गोव्याला नियमित जलपुरवठा करता यावा, यासाठी धरण ते गोवा हद्द दरम्यान जलवाहिनी घालण्याचा प्रस्ताव चर्चेला आला असता, दोन्ही राज्यांच्या अधिकार्‍यांनी त्याला मान्यता दिली.

पर्रीकरांनी दिला होता पर्याय…

गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी असताना मनोहर पर्रीकर यांनी तिळारी धरणाचं पाणी नियमितपणे मिळण्यासाठी 23 किलोमीटर लांब जलवाहिनी टाकण्याचा पर्याय सुचवला होता. तिळारी धरण ते गोवा हद्दीपर्यंत जलवाहिनी टाकून पाणी घेतलं, तर कोणताही अडथळा होणार नाही, असं पर्रीकर म्हणाले होते. महाराष्ट्र हद्दीतील कालव्यांच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. त्यामुळे तिथले कालवे दरवर्षी फुटतात. गोव्यातील लोकांना त्याचा फटका बसतो. आता जलवाहिनीतून पाणी आणण्याचा निर्णय झाल्यानं गोमंतकीयांना दिलासा मिळाला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!