तीन यात्रा, तीन नेते, अन् एक ध्यास

ध्यास एकच.. गोव्याचा, गोमंताकीयांचा आणि पर्यायाने देशाचाही!

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः १९९९ सालच्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा भाग म्हणून गोवा भारतीय जनता पार्टीने संपर्क यात्रा काढण्याचं ठरवलं. अवघं ४ आमदारांचं बळ असलेल्या ताकदीच्या आधारावर निवडणुकीला सामोरं जायचं होतं. श्रीपादभाऊ नाईक यांच्या नेतृत्वाखाली यात्रा झाली. सदर यात्रेचा मार्ग निश्चित करण्याकरीता पेडणे पासून काणकोणपर्यंत ज्या मार्गाने यात्रा जायची, त्या मार्गाने काही प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रवास केला. सदर यात्रे दरम्यान श्रीपादभाऊंच्या आईचं निधन झालं. पण भाऊंनी आवश्यक वेळ काढून सदर यात्रा पूर्ण केली. त्यासालच्या निवडणुकीत भाजपाची ताकद ४ वरून १० झाली. दुर्दैवाने श्रीपादभाऊ ती निवडणुक हरले. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं आणि म्हणून त्यासाली लोकसभेच्या मध्यावदी निवडणुकीत ते उत्तर गोव्यातून विजयी झाले आणि ती परंपरा त्यांनी आजही कायम राखली आहे.

हेही वाचाः डिचोली परिसरात सापडले डेंग्यूचे सहा रुग्ण

२०१२ साली स्व. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली अशाच यात्रेचं आयोजन

२०१२ साली स्व. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली अशीच यात्रा काढण्यात आली. पण यावेळी परिस्थिती थोडी वेगळी होती. तोपर्यंत २००० ते २००५ पर्यंत भारतीय जनता पार्टी सत्ताधारी आणि नंतर २०१२ पर्यंत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून कार्यरत होती. मनोहर पर्रीकर हे गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि त्यावेळचे विरोधी पक्षनेते होते. त्या पार्श्वभूमीवर ही यात्रा होती. सदर यात्रेपूर्वीसुद्धा मार्ग निश्चित करण्यासाठी प्रवास झालाच. त्या यात्रेत स्व. पर्रीकर यांचा रात्रीचा मुक्काम कार्यकर्त्याच्या घरी असायचा. यात्रा सुरू होण्यापूर्वी तयारीच्या एका बैठकीत त्यांनी आपले जेवण साधं असावं आणि विशेषतः रात्री चपाती आणि भाजी पूरे असं सांगितलं होतं. बोलताना त्यांनी भाजीचं उदाहरण देताना तांबडी भाजी वगैरे चालेल असं म्हटलं. पण झालं असं, की सगळ्यांना वाटलं की भाईंना तांबडी भाजी आवडते आणि हमखास प्रत्येक ठिकाणी तांबड्या भाजीचा मेनू जेवणात असायचा. नंतर नंतर तर तांबडी भाजीचं नाव घेतलं तरी भाईंचा चेहरा लाल व्हायचा. सदर निवडणुकीत भारतीय जनता पार्टीची ताकद १४ वरून २१ झाली आणि पूर्ण बहुमताने सत्ताधारी बनली. २०२२ साली गोवा विधानसभेची निवडणुक आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा विविध मतदारसंघांचा दौरा सुरू

नुकताच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विविध मतदारसंघांचा दौरा सुरू केला आहे. प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांचा संघटनात्मक कामावर भर देऊन दौरा सुरू आहे. स्वाभाविकपणे मुख्यमंत्र्यांचा दौरा हा राजकीय स्वरूपाचा आहे. पण हा दौरा इतर दोन यात्रांपेक्षा वेगळा आहे. यावेळी भारतीय जनता पार्टी २०१२ गेली १० वर्षे सत्तेत आहे. स्व. मनोहरभाई पर्रीकर यांच्या निधनानंतर डॉ. सावंत यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आली. त्यानंतर कोरोना महामारीमुळे दीड वर्ष व्यवस्थित काम करता आले नाही. हे कमी की काय म्हणून तौक्ते वादळामुळे व ४० वर्षानंतर आलेला महापूरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा त्यांना सामना करावा लागला. राजकारणात निवडणुक हे एक न टाळता येणारे सत्य आहे.

हेही वाचाः ऑनलाईन शिक्षणावर ७७ टक्के विद्यार्थी असमाधानी!

धास एकचः गोव्याचा, गोमंताकीयांचा व पर्यायाने देशाचा विकास

आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचं सरकार स्थापन करण्यासाठी दौऱ्यावर बाहेर पडले आहेत. मुख्यमंत्री म्हणून अवघा अडीच वर्षांचा अनुभव पण पक्षाच्या विजयासाठी त्यांनी कंबर कसली आहे. समाजातील आई, आजोबा, तरुण, शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी आणि गोमंतकीयांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद देण्याचं आवाहन ते करत आहेत. विश्वास आहे की या आवाहनाला गोव्याची जनता निश्चित प्रतिसाद देणार. यात्रा व नेते जरी तीन असले, तरी ध्यास मात्र एकच आहे – विकास. गोव्याचा, गोमंताकीयांचा व पर्यायाने देशाचाही!

नरेंद्र सावईकर

हा व्हिडिओ पहाः VIDEO | MURDER | चंद्रकांत बांदेकर खून प्रकरणाचा उलगडा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!