स्वप्नील वाळके खूनप्रकरणी बिहारमधून तिघांना अटक

शस्त्रखरेदीत हात असल्यावरून घेतलं ताब्यात

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : मडगाव इथल्या कृष्णी वाळके ज्वेलर्सचे मालक स्वप्नील वाळके यांच्या खूनप्रकरणी पोलिसांनी बिहारमध्ये तिघांना अटक केली आहे. या तिघांना हस्तांतर वॉरंटवर गोव्यात आणण्यात येणार आहे. खून प्रकरणात वापरलेलं पिस्तूल खुन्यांना पुरविण्याच्या आरोपाखाली त्यांना अटक केली आहे.

कुंदन कुमार, राहूल कुमार मळिक आणि शानी कुमार अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. या प्रकरणातील प्रमुख आरोपी मुस्तफा आणि इव्हेंडर यांनी एक बंदुक बेगुसराय, बिहारमधून विकत आणली होती. अटक केलेले तिघेही युवक बेगुसराय, बिहारचे आहेत. पोलिस निरीक्षक फिलोमेना कॉस्ता यांच्या नेतृत्वाखालील टीमने ही अटक केली आहे.

अटक केलेले आरोपी

अशी आहे पार्श्वभूमी…

भाजपाच्या राज्य कार्यकारणीच्या सदस्या कृष्णी वाळके यांचा स्वप्नील हा मुलगा. मडगाव येथील ग्रेस चर्चच्या मागच्या बाजूला वाळके यांचे कृष्णी ज्वेलर्स नावाचे आस्थापन असून 2 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता या आस्थापनात दोघेजण आत शिरले, त्यांच्याकडे रिव्हॉलवर व चाकूही होता. चाकूने वार केल्याने स्वप्नील हा गंभीर जखमी झाला. हल्ला केल्यानंतर संशयिताने पळ काढला. जखमी अवस्थेत स्वप्नील याला 108 मदतसेवेच्या ऍम्ब्युलन्समधून हॉस्पिसियोत दाखल केले असता, त्याला मरण आले. दिवसाढवळय़ा घडलेल्या या घटनेमुळे शहरात भितीचे वातावरण पसरले होते.

तिघांना झाली होती अटक

या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून ओमकार पाटील व एडसन गोन्साल्विस या दोघांना 24 तासात अटक केली होती, तर तिसरा संशयित मुस्तफा शेख फरारी झाला होता. तो नंतर पोलिसांना शरण आला होता.

चोरीसाठी वापरलेली जीप चोरीची

संशयितांनी चोरीसाठी वापरलेले पिस्तूल व चारचाकी यापूर्वीच जप्त केली आहे. संशयितांनी पिस्तूल बिहारमधून आणले होते, तर चारचाकी दोनापावल येथून चोरी केली होती. चारचाकी चोरल्याप्रकरणी पणजी पोलीस ठाण्यात तक्रारही नोंद करण्यात आली होती. दोनापावल येथील कीगन रॉड्रिग्ज हे इंग्लंडमध्ये असतात. त्यांच्या बंगल्यात एका रात्री प्रवेश करून या संशयितांनी चोरी केली होती. तिथे त्यांना बोलेरो वाहनाची चावी सापडली होती.

पहा व्हिडिओ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!