गोव्याचा घात करणाऱ्यांना नैसर्गिक न्याय मिळाला

काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांची घणाघाती टीका

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः गोवा राज्याला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. गोमंतकीयांनी नेहमीच निसर्गाची पूजा केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी संगनमत करून आमची माता आणि जीवनदायीनी म्हादई नदीचा कर्नाटकशी सौदा करून गोव्याचा विश्वासघात करणाऱ्या माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची मंत्रीमंडळातून झालेल्या हकालपट्टीने त्यांना नैसर्गिक न्याय मिळाला आहे, अशी घणागाती टीका काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे. म्हादईचा सौदा करण्याच्या कारस्थानात सामील झालेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनाही लवकरच शिक्षा होणार असून गोमंतकीयांच्या भावनांशी खेळ मांडणाऱ्यांसाठी हा एक धडा आहे, असं चोडणकर म्हणालेत.

हेही वाचाः CORONA UPDATE | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा वाढ

गोव्यासाठी ही चांगली गोष्ट

उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक हे आता पोर्ट्स, शिपींग आणि वॉटरवेज तसंच पर्यटन खात्याचे राज्यमंत्री झालेत. आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र ताबा त्यांच्याकडून काढल्याने केंद्रीय मंत्रीमंडळातून त्यांची पदनावती झालेली आहे. परंतु, गोव्यासाठी ही चांगली गोष्ट असून, गोव्याची किनारपट्टी आणि नद्या मोदींच्या क्रोनी क्लबच्या घशात घालण्यासाठी ते देणार नाहीत अशी आशा मी बाळगतो, असं चोडणकरांनी म्हटलंय.

हेही वाचाः नोकिया जी २० भारतात सादर

खरंतर विमानाचे दोन्ही पायलट बदलणं गरजेचं होतं, परंतु….

गोव्यातील रसातळाला गेलेल्या पर्यटन उद्योगाला चालना देत ते राज्याचे पर्यटन मंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर यांच्या ‘मिशन ३० टक्के कमिशनला’ आळाबंद घालण्याचं काम त्यांना सर्वप्रथम करावं लागेल. अत्यंत वाईट परिस्थितीतून आपला देश जात असून, वाईट हवामानातून मार्ग काढण्यासाठी खरंतर विमानाचे दोन्ही पायलट बदलणं गरजेचं होतं. परंतु, त्यांना हात न लावता भाजपने विमानातील इतर कर्मचारी बदलेले आहेत. मंत्रीमंडळ फेररचनेतून देशाला काहीच फायदा होणार नसल्याचा दावा चोडणकरांनी केलाय.

हेही वाचाः एक मोदी आणि अर्धे अमित शहा…केवळ दीड माणसं चालवताहेत केंद्र सरकार !

आरोग्य आणि माहिती तंत्रज्ञान व कायदा क्षेत्रात सकारात्मक बदल होतील अशी आशा

कोविडच्या गैरव्यवस्थापनाने हजारो लोकांचे बळी घेणाऱ्या अकार्यक्षम आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना त्यांच्या कर्माचं फळ मिळालं आहे. समाज माध्यमांवर नियंत्रण आणून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणारे बेजबाबदार केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांचाच आवाज आता बंद झाला आहे. या दोन्ही मंत्र्यांच्या जाण्याने आरोग्य आणि माहिती तंत्रज्ञान व कायदा क्षेत्रात सकारात्मक बदल होतील अशी आशा आपण बाळगुया.

हेही वाचाः कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना थेट प्रवेश? आज सुनावणी

घटनेच्या चौकटीत राहुनच आपली जबाबदारी पार पाडावी

हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नेमणुक झालेले राजेंद्र आर्लेकर यांनी आपल्या भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला हे स्वागतार्ह आहे. परंतु, पक्षीय राजकारण करुन ते गोव्याची मान लाजेने खाली घालणार नाहीत अशी अपेक्षा करुया. त्यांनी घटनेच्या चौकटीत राहुनच आपली जबाबदारी पार पाडावी, अशी मागणी चोडणकरांनी केलीये.

हेही वाचाः आजपासून जनसुनावणी! मग पणजीत गाडी कुठे पार्क कराल?

नवीन मंत्र्यांनी गोव्याच्या अस्मितेशी खेळू नये

काँग्रेस पक्ष नवनियुक्त मंत्र्यांच्या कारभारावर तसंच भाजप सरकारच्या प्रशासनावर कडक नजर ठेवणार असून, नवीन मंत्र्यांनी गोव्याच्या अस्मितेशी खेळू नये तसंच गोमंतकीयांच्या भावनांचा मान राखावा, असं आवाहन चोडणकरांनी केलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!