…या गावानं रचला विक्रम ! 100 टक्के लसीकरणाची मोहीम फत्ते

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गावात येवून केलं ग्रामस्थांचं अभिनंदन

उदय सावंत | प्रतिनिधी

वाळपई : सत्तरी तालुक्याच्या सुरला गावामध्ये नागरिकांनी 100 टक्के लसीकरण मोहीम यशस्वी केली आहे. गोमंतकातील हा पहिला गाव आहे. ग्रामीण भाग असतानासुद्धा नागरिकांनी चांगल्या प्रकारचे सहकार्य दिल्यामुळे इतर गावांनीही त्यांचा आदर्श घेणे आज खरोखरच गरज आहे. नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल राज्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी सुरला गावातील नागरिकांचे अभिनंदन केले आहे. त्याचप्रमाणे शतक पार केलेल्या गोपिकी गावकर यांचे त्यांनी खास अभिनंदन केले.

गोव्यातून कोविड रोगावर पूर्णपणे नियंत्रण आणण्याच्या दृष्टीकोनातून सरकारने वेगवेगळ्या स्तरावर लसीकरण मोहीम हाती घेतलेली आहे. सदर मोहीम यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. सत्तरी तालुक्यात पंचायत स्तरावर लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सत्तरी तालुक्यातील ठाणे ग्रामपंचायत क्षेत्रातील सुरला गाव हा पूर्णपणे ग्रामीण स्वरूपाचा आहे. गोवा कर्नाटक यांच्या सीमेवर असलेल्या गावात गोवा सरकारच्यावतीने अनेक स्वरूपाच्या सुविधा निर्माण केलेल्या आहेत.

आमदार तथा माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी गावाला वीज पुरवठा केलेला आहे. त्याचप्रमाणे हल्लीच सदर ठिकाणी असलेल्या माध्यमिक शाळा इमारतीसाठी सरकारने खास निधीची तरतूद केलेली आहे. राज्याच्या शहरी भागापासून जवळपास पन्नास किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या या सुरला गावात सरकारने खास लसीकरण मोहीम आयोजित केली होती. वाळपई सरकारी रुग्णालयाच्या माध्यमातून ही मोहीम पूर्णपणे यशस्वी झाली. या गावात खास आयोजित करण्यात आलेल्या शिबिरामध्ये आरोग्य खात्याचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. या गावात सदर शिबिराच्या योजनांच्या माध्यमातून नागरिकांनी पूर्णपणे सहकार्य देऊन शंभर टक्के लसीकरण मोहीम यशस्वी केली आहे.

गोव्यातील हा पहिलाच गाव, ज्या गावातून 100% मोहीम यशस्वी करण्याचे कार्य पूर्ण झाले आहे. आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी रविवारी खास या गावाला भेट देऊन सर्व नागरिकांचे अभिनंदन केले. या गावाचे पंच सभासद तथा ठाणे पंचायतीचे उपसरपंच सूर्यकांत गावकर यांनी यासाठी चांगल्या प्रकारचे योगदान दिले. याबद्दल विश्‍वजित राणे यांनी त्याचे खास अभिनंदन केले. या गावाने आतापर्यंत सरकारला चांगल्या प्रकारचे सहकार्य केलेली आहे.

गोवा राज्याचे माथेरान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावात नैसर्गिक साधनसंपत्ती लाभलेली आहे. त्यामुळे पर्यटन दृष्टिकोनातून या गावाचा चांगल्या प्रकारे विकास होऊ शकतो. यामुळे येणाऱ्या काळात आपण या सदर्भात गांभीर्याने लक्ष देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी गावाच्या विकासाला चांगल्या प्रकारचे सहकार्य देण्यास आपण कटीबद्ध असल्याचे सांगितले. आपले वडील तथा माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांना या गावाबद्दल आत्मीयता आहे. या माध्यमातून गावाच्या विकासाला चांगल्या प्रकारची चालना मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून या गावाचा निश्चित प्रमाणात प्राधान्यक्रमाने विचार केला जाईल, अशा प्रकारचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!