हा नवा भारत आहे…पीएम मोदी यांचा पाक-चीनला कडक इशारा

देशातल्या मुलींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली मोठी घोषणा !

Goan Varta Live | प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी ७५ व्या स्वातंत्र्यदिनाला लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी भारताच्या पुढील २५ वर्षांच्या विकासाची दिशा मांडली. त्याबरोबरच देशाच्या सुरक्षेवर बोलत त्यांनी साम्राज्यवादी चीन आणि दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानलाही कडक भाषेत इशारा दिला.

संरक्षण क्षेत्रात भारत स्वावलंबी होत आहे. भारताला आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडण्यासाठी आपली संरक्षण सज्जता तितकीच सतर्क करावी लागेल. संरक्षण क्षेत्रात, देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी, भारतीय कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, आमच्या मेहनती उद्योजकांना नवीन संधी देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. देशाच्या संरक्षणात असलेल्या आपल्या सैन्याचे हात मजबूत करण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही, असं आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिलं.

दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक संबंधांचे स्वरूप बदलले आहे. करोना नंतरही नवीन जागतिक व्यवस्था निर्माण होण्याची शक्यता आहे. करोना दरम्यान भारताचे प्रयत्न जगाने पाहिले आणि कौतुक केले आहे. आज जग भारताकडे नव्या दृष्टीकोनातून पाहत आहे. या दृष्टीचे दोन महत्त्वाचे पैलू आहेत. एक दहशतवाद आणि दुसरा साम्राज्यवाद, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

स्वदेशी विमानवाहू जहाज विक्रांतची समुद्रात चाचणी सुरू आहे. आज भारत आपले लढावू विमान विकसित करत आहे. पाणबुडी बनवत आहे, एवढचं नव्हे तर गगनयान मोहीमही राबत आहे, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक करून भारताने हा नवीन भारत असल्याचा संदेश शत्रूला दिला आहे. भारत कठोर निर्णय घेऊ शकतो, हा संदेश कारवाईतून भारताने शत्रुला दिला आहे. दहशतवादी कारवाया आणि साम्राज्यवादाचा प्रयत्न करणाऱ्यांना यातून इशारा दिला आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

“देशासाठी ही गर्वाची बाब आहे, की शिक्षा असो वा खेळ.. बोर्डाचे निकाल असो वा ऑलिम्पिकचं मैदान, आपल्या मुली आज अभूतपूर्व कामगिरी करत आहे. भारताच्या मुली आपली जागा घेण्यासाठी आतुर आहेत. आपल्याला हे निश्चित करावं लागेल, की प्रत्येक क्षेत्रात महिलांचा समान सहभाग असेल. आपल्याला हे ठरवायचंय की रस्त्यापासून कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षिततेची भावना व्हावी, सन्मानाची भावना व्हावी. त्यामुळे देशातील सरकारला, प्रशासनाला आणि नागरिकांना आपली १०० टक्के जबाबदारी पार पाडावी लागेल. हा आपल्याला स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांचा संकल्प बनवावा लागेल. मी आज हा आनंद देशवासीयांसोबत साजरा करतोय”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!