हा आमच्यावर अन्याय….

‘लिव्ह व्हेकन्सी’च्या जागी निवृत्त शिक्षकांची नियुक्ती

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यातील प्राथमिक शाळांमध्ये अनेक ठिकाणी ‘लिव्ह व्हेकन्सी’ अर्थात दीर्घ कालावधीसाठी रजेवर गेलेल्या शिक्षकांच्या जागी निवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत आहे. बीएड, डीएड पूर्ण केलेल्या हजारो उमेदवारांकडून ‘हा आपल्यावर अन्याय आहे’, अशी भावना व्यक्त होत आहे.       

गोव्यातून दरवर्षी  ३००हून अधिक उमेदवार बीएड, डीएड होतात

या संदर्भात उमेदवारांनी विविध मुद्दे उपस्थित केले आहेत. गोव्यातून दरवर्षी  ३००हून अधिक उमेदवार बीएड, डीएड होतात. आजघडीला हजारो असे उमेदवार बेरोजगार आहेत. पदवीधारक असूनही नोकरी मिळत नसल्याने ते हताश झाले आहेत. अनेकदा अनुभव नसल्याने नोकरी नाकारली जाते. मग, ‘लिव्ह व्हेकन्सी’च्या ठिकाणी संधी असतानाही निवृत्त शिक्षकांना नेमले जात असेल तर प्रशिक्षित नवीन उमेदवारांना संधी कशी मिळणार, असा ते प्रश्न उपस्थित करत आहेत.

हेही वाचा:सेवेत घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, सरकारला इशारा…

बीएड, डीएड केलेले उमेदवार म्हणतात…      

फोंडा तालुक्यासह अनेक ठिकाणी सध्या सरकारी प्राथ​मिक शाळांतून 

‘लिव्ह व्हेकन्सी’ कालावधीत निवृत्त पेन्शनधारकांना नेमण्यात आले आहे.       

अशा शिक्षकांना आधीच ४० ते ५० हजार रुपये पेन्शन असते. त्यात अधिकचा पगार मिळतो. असे केल्याने जे तरुण बीएड, डीएड असूनही ‘बेकार’ आहेत  त्यांचा विचार कोणी करावा?   

‘लिव्ह व्हेकन्सी’ असेल तेथे जर पात्र नवख्या उमेदवारांची नेमणूक केली केली तर किमान अनुभव मिळू शकतो. त्याचा भविष्यात उपयोग होऊ शकतो. येत्या अधिवेशनात राज्य सरकारने या विषयावर गंभीरपणे विचार करावा.

शिक्षण संचालक शैलेश झिंगडे म्हणतात…

एखादा शिक्षक जेव्हा दीर्घकालीन रजेवर जातो, तेव्हा त्या जागी तत्काळ पर्यायी शिक्षकांची उपलब्धता करणे गरजेचे ठरते. फ्रेशर बीएड, डीएड उमेदवार निवडीसाठी कायद्यान्वये अनेक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. त्यासाठी बराच विलंब लागतो. मुलांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सरकारनेच निवृत्त शिक्षकांना तात्पुरत्या स्वरुपात नियुक्त करण्याची तरतूद केली आहे. जी अनेक वर्षे सुरू आहे, असं शिक्षण संचालक शैलेश झिंगडे म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!