CORONA | स्तनदा मातांकडून मुलांना कोविड होण्याची शक्यता

गोवा सरकारच्या तज्ज्ञ समितीचा अंदाज; स्तनपान करणाऱ्या मातांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्याची शिफारस

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः कोविड-19ची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असणार आहे, असं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलंय. या पार्श्वभूमीवर स्तनपान करणाऱ्या मातांना लसीकरणासाठी प्राधान्य गट मानावा, अशी शिफारस गोवा सरकारने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने केली आहे. गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्या नेतृत्वाखालील समितीची शनिवारी बैठक झाली आणि तिसऱ्या लाटेदरम्यान मुलांवरील उपचार नियमावली यावेळी तज्ज्ञ समितीकडून सुचवण्यात आली.

हेही वाचाः वाहनांच्या टायर्सबाबत नव्या नियमावलीचा प्रस्ताव

मुलांना पालकांच्या माध्यमातून कोविडची लागण होण्याची शक्यता

दोन वर्षं किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना स्तनपान करणाऱ्या मातांना लसीकरणासाठी प्राधान्य दिलं पाहिजे. कोविडच्या तिसऱ्या लाटेदरम्यान मुलांना कोविड-19 ची लागण पालकांच्या माध्यमातून होईल असा अंदाज आहे. सरकारी आकडेवारीनुसार, देशात 12 वर्षांखालील 2.5 लाख मुलं आहेत आणि एकूण 3.5 ते 4 लाख मुलं आहेत, जी 18 वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखालील कृती दलासमोर तज्ज्ञ समितीची ही शिफारस ठेवण्यात येणार असल्याचं डॉ. बांदेकर म्हणाले.

हेही वाचाः शिवसेना गोवाची ‘कोविड सेना’ कोविडबाधितांच्या मदतीला

नवजात अतिदक्षता युनिटमधील बेड्ची संख्या वाढवण्याची शिफारस

एकूण कोविड पॉझिटिव्ह केसेसपैकी 7 ते 8 टक्के केसेस पहिल्या लाटेच्या वेळी मुलांची होती, जी दुसऱ्या लाटेदरम्यान जवळजवळ 12 टक्क्यांपर्यंत वाढली आहेत. संपूर्ण देशातही हेच लक्षात आलं आहे. तज्ज्ञ समितीने शिफारस केली आहे की नवजात अतिदक्षता युनिटमधील बेड्ची संख्या वाढवावी, तर उत्तर आणि दक्षिण गोव्यात एक बालरोग रुग्णालय असावं, जे राज्यात तिसरी लाट आली तर उपचारासाठी कार्यरत असेल. समितीने असंही सुचवलंय की अडल्ट आयसीयू बेड्सपैकी 50 टक्के बेड्स पिडियाट्रिक आयसीयू बेड्समध्ये रूपांतरित केले पाहिजेत, असं गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे वरिष्ठ डॉक्टर जगदिश काकोडकर म्हणाले.

हेही वाचाः मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कृती दलाची पहिली बैठक

‘एम्स’च्या नियमावलीचं पालन करणार

तज्ज्ञ समितीने तिसऱ्या लाटेदरम्यान मुलांसाठी दिल्या जाणाऱ्या उपचार नियमावलीवरही चर्चा केली. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स)ने विहित केलेली उपचार नियमावलीचं गोव्यातही पालन केलं जाणार असल्याचं, डॉ. काकोडकर म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!