…तर मुख्यमंत्र्यांनी दक्षिणेतील बाबूंचा मटका प्रथम बंद करावा !

गोवा फॉरवर्डचे कार्याध्यक्ष किरण कांदोळकर यांचा सरकारवर हल्लाबोल !

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसा : मटका बंद करण्यासाठी मटकेकार हवेत ना, मग दक्षिण गोव्यातील तुमच्या बाबू नामक सहयोगी मटकेकारचा मटका प्रथम मुख्यमंत्र्यांनी बंद करावा. गोवा मेन म्हणून मटका सरकारनेच सुरू केला आहे. पोलिसांचा आधार घेऊन हे सरकार मटका चालवायला लागले असून गोवा मेन हा सरकारचा मटका आहे, असा गंभीर आरोप गोवा फॉरवर्डचे कार्याध्यक्ष किरण कांदोळकर यांनी सरकारवर केला आहे. कोलवाळ येथे महामार्गाच्या पाहणीवेळी माजी आमदार किरण कांदोळकर पत्रकारांशी बोलत होते.

हल्लीच कोलवाळ पोलिस स्थानकाच्या उदघाटनावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या भागातील मटकेकार जास्त बोलत असून त्यांनी आपल्या वृत्तीत सुधारणा न केल्यास त्यांना हे पोलिस स्थानक योग्य ती दिशा दाखविल, असा इशारा दिला होता. यावर बोलताना कांदोळकर वरील आरोप केला. मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केले आहे, ते आपण ऐकले आहे. ते आपल्याला उद्देशून केले आहे, असे मला वाटत नाही. पण गोव्यात मटका सुरू आहे, तो देखिल पोलिस अधिकार्‍यांच्या नजरेखालून, हे जर मुख्यमंत्री मानतात तर ते आपल्याच खात्यावर टीका करत असून आपल्याच खात्यावर त्यांना विश्वास नाही. आपल्या खात्यात काय चालले आहे, हेच ते जनतेला नव्हे तर आपल्या खात्यालाच दाखवून देताहेत, असा टोला कांदोळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर हाणला.

भाजप सोबत असाल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गंगेत बुडवून शुध्द व्हाल. काँग्रेसवाले कितीही पापी असल्यास ते शुध्द होतात. भाजपला सोडून गेल्यास, तो पापी गुन्हेगार होतो. मुख्यमंत्र्यांनाच मटक्याचे कमीशन जाते. कमीशनसाठीच सरकारने गोवा मेन हा मटका सुरू केला आहे, असाही आरोप कांदोळकर यांनी केला.

थिवीमध्ये पोलिस स्थानक आणले म्हणून आमदार धमकीची भाषा बोलत आहे. दक्षिण गोव्यात रासूका लावले आहे. तसेच थिवीमध्ये पोलिस स्थानक आणले म्हणून आम्ही थिवीवासी कधीच घाबरणार नाहीत. तर जनमत चोरल्याच्या आरोपावरून थिवीवासी आमदारांवरच तक्रार गुदरण्यास तयार आहेत. थिवीतील लोकांनी काँग्रेस पक्षाला जनमत दिले होते. हे जनमत या आमदाराने चोरले असून ते चोर आहेत. त्यामुळे त्यांच्याविरूध्द कोलवाळ पोलिसांत लगेच तक्रार दाखल केली जाईल. इकडे तिकडे उड्या मारणार्‍या, बेपत्ता झालेल्या लोकांनी आम्हाला शिकवू नये, असा सल्लाही कांदोळकर यांनी दिला. गोमेकॉमध्ये जे लोक ऑक्सिजन अभावी मरण पावले आहेत, त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या मुख्यमंत्र्यांवर काँग्रेस व सामाजिक संस्थांनी तक्रार दाखल केलेली आहे. त्या तक्रारींची प्रथम चौकशी या सरकारने करावी, अशी मागणीही कांदोळकर यांनी केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!