माणुसकीच्या ओलाव्यानं पुन्हा बहरला ‘मोना-मोनी’चा संसार !

जंगलात राहणाऱ्या मुकबधीर-दिव्यांग दांपत्याला सोशल मीडियामुळं मिळाली मदत

अर्जुन धस्के | प्रतिनिधी

पणजी : मोना अन् मोनी, दोघंही मुकबधीर आणि दिव्यांग…त्यांच्या आयुष्यातले शब्द तर केव्हाच संपले होते…उरली होती ती फक्त वेदना…जंगलातल्या कौलारू घरातला त्यांचा एकाकी संसार…त्यांची करूण कहाणी सोशल मिडीयावर आली अन् मदतीचा ओघ सुरू झाला. माणुसकीच्या ओलाव्यानं मोना-मोनीचा संसार पुन्हा बहरला. कोरोना महामारीच्या काळात जीवंत राहणं हेच सर्वांसमोर एक मोठं आव्हान असताना, जगण्याची जिद्द आणि जगवण्याची माणुसकी याची ही जीवंत कथा…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले तुळस इथं हे डिचोलकर दांपत्य राहतं. मोना अन् मोनी या नावानं त्यांचा परिचय आहे. जंगलात असलेल्या साध्या कौलारू घरात हे दोघे असतात. मुकबधीर आणि दिव्यांग असलेलं हे दांपत्य कोणतंच काम करू शकत नाही. सध्याच्या कठीण काळात त्यांना जगण्यासाठी कोणाच्यातरी मदतीची गरज होती. यासंदर्भात फेसबुकवर एक पोस्ट आली. ती पोस्ट पाहून काहींनी त्यांना मदतीसाठी तळमळीनं प्रयत्न केले. यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो कोकणी रानमाणुस इको टुरीझमच्या प्रसाद गावडे याचा. सहयाद्रिच्या कुशीतल्या दुर्लक्षित स्थळांवर जीवापाड प्रेम करणा-या या युवकानं ही पोस्ट पाहताच वेंगुर्ला गाठलं. स्थानिकांच्या मदतीनं तो जंगलात पोहोचला आणि मोना-मोनीला दिलासा दिला. त्याबाबतची पोस्ट टाकली आणि त्यावर मदतही जमा झाली.

यानंतर गराजलो रे गराजलो या फेसबुक पेजच्या टीमनंही या डिचोलकर दांपत्याला भेट दिली. जाताना जीवनावश्यक वस्तुही नेल्या. ही मदत पाहुन मोना अन् मोनी यांना आपले अश्रु लपवता आले नाहीत. जंगलातल्या एकाकी जीवनातही ते दोघे एकटे नाहीत, याचा त्यांना जणु साक्षात्कार झाला. सध्याच्या महामारीच्या काळात जिथं आपला जीव सांभाळणं हेच एक मोठं आव्हानं आहे, तिथं मोना अन् मोनी यांची जगण्याची जिद्द आपल्याला खूप काही शिकवून जाते. सोशल मिडीयाचं एक चांगलं रूप यानिमित्तानं पाहायला मिळालंच परंतु केवळ कमेंट करण्यापेक्षा सोशल मिडीया वापरणा-या प्रत्येकानं जर प्रत्यक्ष कृती करून अशीच माणुसकी दाखवली तर समाजातले अनेक प्रश्न सहज सुटतील, यात शंका नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!