रस्ता उध्वस्त करून ऐन पावसाळ्यात केबल घालण्याचं काम

पार्से-तुये ते पेडणे रस्त्यावर कंत्राटदाराचा मनमानी कारभार

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः आगरवाडा व्हाया पार्से-तुये ते पेडणे या रस्त्याला या पूर्वी एकही खड्डा नव्हता. मात्र हल्लीच केबल टाकण्याच्या कामासाठी कंत्राटदाराने ऐन पावसाळ्यात रस्ता मधोमध खोदुन धोकादायक स्थितीत ठेवला आहे. परिणामी जोरदार पाऊस पडल्याने आणि माती रस्त्यावरच असल्याने पाण्याचा प्रवाह बदला. पाणी अनेकांच्या घरात घुसलं, अनेक वाहनं रस्त्यावर रुतून पडली. यामुळे पार्सेचे जागृत नागरिक तथा गोवा फॉरवर्डचे नेते दीपक कळंगुटकर यांच्या नैतृत्वाखाली, स्थानिक नागरिकांनी काम रोखून धरलं आणि ठेकेदाराला जाब विचारला. रस्ता विभागाच्या अभियंत्यांना घटनास्थळी बोलावून घेतलं. कोणताही परवाना नसताना ठेकेदाराने मनमानी कारभार करत रस्ता खोदकाम केला असल्याचा आरोप यावेळी कळंगुटकरांनी केला.

अभियंत्याने आदेश दिलेच नाहीत

अभियंत्यांना या कामाविषयी कोणतीच माहिती नव्हती. किंवा त्यांच्याकडून असा कोणताही आदेश दिला नसल्याने त्यांनी हे काम थांबवलं असल्याचं अभियंता गावस म्हणाले. पीडब्ल्यूडीने कंत्राटदाराविरोधात तक्रार दाखल केली असून त्यातील प्रत जोडली असल्याचंही ते म्हणालेत.

नोव्हेंबर २००६ साली माझ्याकडे आली होती ऑर्डर

कंत्राटदाराला ऑर्डरबद्दल विचारलं असता त्यांनी सदर काम करण्यासाठी नोव्हेंबर २००६ रोजी आपल्याकडे ऑर्डर आली असल्याचं सांगितलं. तर दुसऱ्या बाजूने स्थानिक पंच सदस्य प्रेमनाथ कानोलकर यांनी याविषयी माहिती देताना स्थानिक पंचायतीला याविषयी कुणीही कळवलं नसल्याचं सांगितलं. आयटीआय उताराजवळ रस्ता धोकादायक झाला आहे. कारण हा अरुंद रस्ता आहे. हा रस्ता खोदून आठवडा झाला आहे. भर पावसात हे काम सुरू करून लोकांच्या जीवनाशी खेळणाऱ्या ठेकेदाराविषयी कळंगुटकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

उत्कृष्ट रस्ता केला खराब

हा रस्ता २०१६ मध्ये आमदार आणि तत्कालीन मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मिकांत पार्सेकर यांनी केला. रस्त्याची गुणवत्ता राखली गेली होती आणि हा रस्ता करताना सर्व लोकांनी सहकार्य केलं. आज शिक्षणासाठी ब्रॉडबँडच्या नावाखाली पेडणे तालुक्याचा एक उत्कृष्ट रस्ता खराब करण्यात आलाय. 

लोकांना नुकसान भरपाई द्या

गोवा फॉरवर्डचे दीपक कळंगुटकर बोलताना म्हणाले, हा सुंदर रस्ता, त्याची सरकारने निगा राखायला हवी. शिवाय या कामामुळे ज्या स्थानिक लोकांच्या घरात पाणी घुसून नुकसान झालंय, त्यांना नुकसान भरपाई द्यायला हवी. या रस्त्याला कोणीच वाली नसल्यासारखं कंत्राटदाराने मनमानी केली आहे, ती यापुढे खपवून घेतली जाणार नाही.

हेही वाचाः ही आजची गर्दी; उद्या तर मुख्य बाजार; उद्या काय?

नागरिकांनी व्यक्त केली नाराजी

रस्ता खोदकाम करण्यासाठी रस्ता विभाग पावसाळ्यात ना हरकत दाखला देत नाही. मात्र एखादी कंपनी २००६ चा परवाना घेऊन चक्क पावसाळ्यात रस्ता खोदकाम करत असल्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सध्या रस्ता विभागाने ठेकेदाराला काम बंद ठेवण्याची सुचना केली आहे. यावेळी दीपक कळंगुटक, माजी जि.प.सदस्य तसंच पंच सदस्य प्रेमानंद  कांदोलकर, पंच अरुण पार्सेकर, श्याम कांबळी, मधुकर कांबळी, महेश कांबळी, शंकर कांबळी, संदीप कांबळी आणि इतर स्थानिक उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!