उपमुख्यमंत्री कवळेकरांनी कोविड बाधितांसाठी केलेलं कार्य हे आदर्श कार्य

विश्वजीत राणेंचं प्रतिपादन; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते केपेत कोविड योध्यांचा सत्कार

Goan Varta Live | प्रतिनिधी

केपेः उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकरांनी केपेमध्ये ऑक्सिजन युक्त ५० खाटांचं कोविड स्टेप अप केंद्र सुरू केलं, रुग्णांची ने आण करण्यासाठी गाड्या ठेवल्या, दुर्गम भागातील रोग्यांसाठी ऑक्सिजन ऑन व्हील्स सुरू केलं, रुग्णांच्या घरच्यांना घरपोच १५ दिवस पुरेल एवढं धान्य आणि इतर खाण्याच्या वस्तूंचा मोफत पुरवठा केला, हे कोविड रुग्णांसाठी गोव्यात केलेलं एक आदर्श कार्य असून, इतर कुठेच असं कार्य झालं नसल्याची ग्वाही राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणेंनी केपेत कोविड योद्ध्यांच्या सत्कार सोहळयात बोलताना दिली. आरोग्य खात्याकडून केपे नगरपालिकेत कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा केपेचे आमदार चंद्रकांत (बाबू) कवळेकर या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.

६४ कोविड योद्ध्यांचा सत्कार सोहळा

या कार्यक्रमात एकूण ६४ कोविड योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. केपे नगरपालिका सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री कवळेकर आणि आरोग्यमंत्री राणे यांच्यासोबत केपेच्या नगराध्यक्ष सुचिता शिरवईकर, आरोग्य खात्याचे संचालक डॉ. डिसा आणि सह संचालक डॉ. बोरकर, माजी मंत्री प्रकाश वेळीप, द.गो.जि. पंचायतीचे उपाध्यक्ष खुशाली वेळीप, जिल्हा पंचायत सदस्य शाणू वेळीप, संजना वेळीप, सिद्धार्थ गांवास देसाई, भाजप अनुसूचीत जाती जमातीचे अध्यक्ष प्रभाकर गांवकर, केपे भाजप मंडळाचे अध्यक्ष संजय वेळीप, केपे मतदारसंघाचे प्रभारी विशाल शाबू देसाई, बार्शेचे माजी सरपंच दत्ताराम गांवकर, खोलाचे उपसरपंच पंढरी प्रभुदेसाई आणि केपे प्राथमिक केंद्र आणि केपे कोविड स्टेपअप केंद्राशी संलग्न डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होते.

टीका करणं सोपं, मात्र स्तुती करणं कठीण

राज्यात कोविड परिस्थितीवर मात करण्यात आरोग्य मंत्र्यांनी चांगली कामगिरी बजावली आहे. दुसऱ्या लाटेत एवढ्या मोठया प्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता भासणार असल्याची कसलीच चिन्हे आधी नव्हती. अचानक प्राणवायूची मागणी वाढली आणि सर्व यंत्रणेवर जो ताण आला त्याला हाताळण्यात डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यशस्वी ठरलेत. टीका करणं जेवढं सोपं असतं, तेवढंच कठीण केलेल्या कामाची स्तुती करणं आणि वास्तव जनतेसमोर ठेवणं, असा विरोधकांना चिमटा काढताना उपमुख्यमंत्री कवळेकर म्हणाले.

आरोग्य कर्मचाऱ्यांचं योगदान मोलाचं

देशांतर्गत कोविडरुपी युद्धच जणू सगळे लढत आहेत. तेही एकाच वेळी. या युद्धाचे खरे योद्धे सर्व आरोग्य सेवक आहेत, ज्यांच्याशिवाय हा धोका कमी करणं शक्यच नव्हतं. त्यामुळेच आज कोविड योद्ध्यांचा सत्कार करण्यात मला आनंद होत असल्याचं उपमुख्यमंत्री म्हणाले. डॉ प्रज्ञा काकोडकर यांच्या नेतृत्वाखाली आय.एम.ए.ची संपूर्ण टीम आणि डॉ. लोर्ना फर्नांडिस आणि डॉ. संतोश वेर्णेकरांच्या नेतृत्वाखालील केपेतील कोविड योद्ध्यांची सर्व टीमने अप्रतीम कामगिरी बजावल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी विशेष नोंदवलं.

उपमुख्यमंत्री कवळेकरांचं कार्य उल्लेखनीय

यावेळी बोलताना आरोग्यमंत्री विश्वजित राणेंनी उपमुख्यमंत्री कवळेकरांनी केपेत केलेल्या कामाची स्तुती केली. तसंच आरोग्य रक्षकांची आभार मानले. नुसत्या केपेच्याच कोविड रुग्णांची सोय कवळेकरांनी न करता, सांगे, काणकोण, आणि सासष्टी तालुक्यातील जनतेची उपमुख्यमंत्र्यांनी सोय केल्याचं आरोग्यमंत्री यावेळी म्हणाले. आरोग्य सेवकांनी सहकार्य केलं नसतं, तर सरकारचे सर्व प्रयत्न फोल ठरले असते. त्यामुळे जनतेने आरोग्य रक्षक असलेले डॉक्टर, नर्स आणि खात्याचे इतर सर्व कर्मचाऱ्यांची कोविड काळातील कामगिरी किती मोठी होती याची जाणीव ठेवावी, असं आरोग्यमंत्री म्हणाले. तसंच ग्रामीण भागातील जनता कोविड विरुद्धची लस घेण्यास सहसा पुढे येत नाही. अशा वेळी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी समजून या लसी संदर्भात कसलीही शंका असल्यास दूर करून घेणं किंवा चर्चा करून शंकेचं समाधान करणं गरजेचं आहे, असं राणे म्हणाले.

यावेळी डॉ. बोरकर आणि संचालक डॉ. डिसा यांची भाषणं झाली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!