उपराष्ट्रपतींनी केली श्रीपाद नाईकांची विचारपूस

श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी सकाळी जीएमसीत भेट देऊन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. श्रीपाद नाईक यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याशी संवादही साधला.

उपराष्ट्रपतींसह मुख्यमंत्र्यांनीही दिली भेट

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्यासह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचीदेखील श्रीपाद नाईकांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. मुख्यमंत्र्यांसोबत प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, भाजप संघटनमंत्री सतीश धोंड आदी. मंत्रीदेखील यावेळी उपस्थित होते.

सोमवारी रात्री अंकोला येथे श्रीपाद नाईक यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पत्नी विजया नाईक तसंच सचिव यांचं निधन झालं. गंभीर जखमी अवस्थेत असलेले श्रीपाद नाईक यांना तत्काळ जीएमसीत दाखल करण्यात आलं. विजया नाईक यांच्यावर गुरूवारी आडपई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. नाईक कुटुंबावर ओढवलेल्या या संकटामुळे संपूर्ण गोवा हळहळला. सहा वेळा सातत्याने उत्तर गोवा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येणारे श्रीपाद नाईक हे एक निगर्वी, मृदु, अजातशत्रू आणि प्रामाणिक राजकारणी म्हणून ओळखले जातात. केंद्रात सध्या त्यांच्याकडे आयूषमंत्री (स्वतंत्र कारभार) आणि सरंक्षण राज्यमंत्री पद आहे. त्यांच्या प्रकृतीवर तसेच उपचारांवर दिल्लीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी नजर ठेऊन आहेत. ते लवकर बरे व्हावेत तसंच त्यांच्या कुटुंबावर जे संकट ओढवलंय ते सहन करण्याची आणि त्यातून बाहेर पडण्याची ताकद त्यांना प्राप्त होवो अशी प्रार्थना त्यांच्या समस्त चाहतावर्ग आणि हितचिंतकाकडून केल्या जात आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!