ट्रकला वीजवाहक तारा अडकून खांब वाकला; मोठा अनर्थ टळला

होंडा-साखळी येथील प्रकार; सोमवारी सकाळची घटना

Goan Varta Live | प्रतिनिधी

होंडाः येथील जंक्शनवर आज सकाळी मोठा अपघात होता होता टळला. या मार्गाने अवजड वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला वीजवाहक तारा अडकून खांब ट्रकवर पडण्याची घटना घडली. त्या प्रकारानंतर या भागात वीज पुरवठा खंडीत झाला. सुदैवाने या प्रकारात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वीज पुरवठा खंडीत झाल्याने परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागलाय.

नक्की काय झालं?

सोमवारी सकाळी 10 ते 10.15 च्या सुमारास या भागातून आपल्या नियोजित स्थळी जाणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये वीज वाहक तारा अडकल्या आणि वीजेचा खांब वाकल्याची घटना घडली. सुदैवाने हा प्रकार घडला तेव्हा या मार्गावरून इतर वाहनांची ये-जा नसल्यानं कुणाला दुखापत झाली नाही. मात्र वीजेचा खांब ट्रकवर कलंडल्यानं ट्रकचं थोड्याफार प्रमाणात नुकसान झालंय.

काही वेळासाठी वाहतूक ठप्प

सदर प्रकार घडल्यानंतर तातडीने वीज विभागाला याची कल्पना देण्यात आली. तसंच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी रोखून ठेवली. वीज विभागाच्या माणसांनी घटनास्थळी दाखल होत तातडीने काम सुरू केलं आणि ट्रकवर कलंडलेला वीजेचा खांब तिथून दूर केला. या नंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.

वीजेच्या खांबांची उंची वाढवून द्यावी

या प्रकारावर प्रतिक्रिया देताना तेथे उपस्थित असलेले विघ्नेश शेट्ये म्हणाले, की या भागातील वीजेच्या खांबांची उंची बरीच कमी आहे. त्यामुळे मोठे मालवाहू ट्रक जेव्हा या मार्गावरून जातात, तेव्हा या वीजेच्या तारा त्या ट्रकमध्ये अडकून वीजेचे खांब वाकण्याचे प्रकार घडतात. अशा प्रकारांमुळे या भागात बऱ्याचदा वीज पुरवठा खंडीत होण्याचा प्रकार घडतो. त्यामुळे स्थानिकांना त्रास सहन करावा लागतो. तसंच अशा प्रकारात मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आमची सरकारला विनंती आहे, की मोठ्या उंचीचे वीजेचे खांब या भागात घालून नागरिकांना दिलासा द्यवा.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!