गांजे ते उसगाव रस्त्यावर ट्रक फसला

गुरुवारची घटना; अनेक ठिकाणी रस्ता खचला; मोठा उपघात होण्यापूर्वी उपाययोजना आवश्यक

Goan Varta Live | प्रतिनिधी

वाळपईः ओपा पाणी प्रकल्पापर्यंत गांजे येथील म्हादई नदीचे पाणी नेण्यासाठी गांजे ते ओपा पाणी प्रकल्पादरम्यान मोठी पाईपलाइन घालण्याचं काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. यासाठी खोदून ठेवलेला रस्ता अत्यंत धोकादायक बनलाय. गुरुवारी या रस्त्यावर एक ट्रक खड्ड्यात अडकून पडला. खोदून ठेवलेला रस्ता पूर्ववत केला नाही, तर भविष्यात या मार्गावर अजून असेच प्रकार घडण्याची शक्यता बोलून दाखवली जातेय.

सहा महिन्यांपासून रस्त्याची दयनीय अवस्था

गांजे उसगाव पंचायत येथे सरकारकडून पाइपलाइन टाकण्यासाठी गांजे ते उसगाव रस्ता खोदण्यात आला आहे. आता सहा महिन्यांहून अधिक काळ झाला रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या खोदलेल्या रस्त्यामुळे वाळपई फोंडा मार्गावरुन वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता. दरम्यान खोदलेला रस्ता दगड टाकून बुजवण्यात आला. परंतु हे काम एवढ्या घाईगडबडीत उरकण्यात आलं की ते व्यवस्थित झालं नाही आणि आता जागोजागी हा रस्ता खचला आहे. आता या पावसाळ्यात मोटारी रस्त्यावरुन उतरत आहेत आणि भविष्यात अजून असेच अपघात या मार्गावर घडू शकतात, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.

गांजे ते उसगाव रस्ता चिखलमय

गांजे ते उसगाव चढावाचा रस्ता पूर्णपणे या पाण्याच्या पाईपलाइन टाकण्याच्या कामामुळे पूर्णपणे खराब झाला आहे. त्यामुळे या भागातून प्रवास करणं जिकीरीचं बनलंय. सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतर असलेला हा रस्ता नाणूस येथूनच चिखलमय बनलाय, तो थेट गांजे येथे ज्या ठिकाणी हा प्रकल्प उभारलाय तिथपर्यंत. दरम्यान या भागातून होणारी टिप्पर ट्रकची अविरत वाहतूक अधिक रस्ता चिखलमय बनण्यास कारणीभूत ठरतेय, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. पंधरा सोळा टन माल घेऊन या भागात ट्रकांची वाहतूक सुरू असल्याने या रस्त्याची अधिक दुर्दशा झालीये. अशातच गुरुवारी एक ट्रक या रस्त्यावर रुतून बसल्याची घटना घडलीये.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!