कोरोनाला अटकाव करत पर्यटन क्षेत्र सुरू राहणं गरजेचं

राल्फ डिसोझाः हॉटेल कर्मचाऱ्यांना हवे लसीचे सुरक्षाकवच

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: कोरोनावर मात करण्यासाठी सरकारचे सर्वतोपरि प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने आपल्या देशाने कोरोना विरोधी लस तयार केली. या लसीकरणातून काही प्रमाणात का होईना पण या भीषण विषाणूंपासून सुरक्षा मिळवण्यात मदत होतेय. जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम आपल्या देशात सुरू आहे. परंतु अपेक्षेप्रमाणे जनता या लसीकरणात सहभागी होतेय,असं वाटत नाहीए. गोमंतकीयांचे करोनापासून रक्षण होण्याबरोबरच राज्याचे अर्थचक्र गतिमान राहण्यासाठी सरकारने पर्यटन क्षेत्राशी निगडित सर्वांना लसीकरणाचे सुरक्षाकवच प्रदान करणं काळाची गरज आहे, असे मत या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. पर्यटन व्यवसाय हा राज्याचा आर्थिक कणा आहे. हे लक्षात घेऊन या क्षेत्रातील हॉटेल व शॅक्समधील कर्मचारी, टॅक्सीचालक, कदंब व खासगी बसचे चालक व वाहक यांचे तातडीने लसीकरण करणं गरजेचं आहे, असे टीटीएजीचे माजी अध्यक्ष तथा हॉटेलमालक राल्फ डिसोझा यांनी म्हटलंय.

हॉटेल कर्मचाऱ्यांना प्राधान्यानं हवं लसीचं सुरक्षाकवच

महाराष्ट्रासह आठ राज्यांमध्ये तर त्याचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या माध्यमातून राज्यातही मोठ्या प्रमाणात लागण होऊ शकते. म्हणूनच या पर्यटकांशी सर्वाधिक संपर्क येणाऱ्यांना प्राधान्याने लसीचे सुरक्षाकवच प्रदान केल्यास राज्यातही ही साथ आटोक्यात येऊ शकते. टॅक्सी चालक, कदंब व खासगी बस वाहक, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि शॅक्समधील कर्मचारी यांच्याशी पर्यटकांचा प्रथम संपर्क येतो. हॉटेलमध्ये ते काही दिवस राहत असल्याने सर्वाधिक संपर्क तेथील कर्मचाऱ्यांशीच येत असतो. यामुळे या कर्मचाऱ्यांना सर्वांत प्रथम करोना लसीचे सुरक्षाकवच देणे आवश्यक आहे.

कोरोनाची दुसरी लाट आली

लॉकडाऊन काळात गोवा बऱ्यापैकी सुरक्षित होता. पण राज्याच्या सीमा खुल्या केल्यानंतर परराज्यांतून प्रवासी येऊ लागले. आता कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही लाट परराज्यांतून येणाऱ्यांच्या माध्यमातूनच पसरली आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा अधिक दक्ष राहणे आवश्यक आहे. म्हणून प्राधान्याने हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय घ्यावा.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!