जलसिंचन खात्याच्या हलगर्जीपणामुळे तिळारी कालवा फुटला

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी
पेडणे: कासारवर्णे पेडणेतील तिळारीचा जो कालवा फुटला त्याला पूर्णपणे जलसिंचन खाते जबाबदार आहे. अनेकवेळा या कालव्याची दुरुस्ती करावी अशी मागणी करूनही त्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांच्या हलगर्जीपणामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं. ते पाणी शेतीसाठी दररोज वापरलं जात होतं. कोसळलेला कालवा जलसिंचन खात्याने माती घालून तात्पुरता दुरुस्त केला आहे, तर सरकारी यंत्रणेने धावपळ करून रस्त्यावरील अडथळे दूर करण्यासाठी बरंच काम करून संध्याकाळी सहा नंतर वाहतूक सुरळीत झाली आहे.

जलसिंचन खात्याचं दुर्लक्ष
तिळारी कालव्यातून हणखणे, चांदेल, हसापुर, कासारवर्णे, नागझर, धारगळ या भागातील शेतीसाठी पाणी सोडलं जातं. हा मुख्य शेतीचा कालवा ठिकठिकाणी कमकुवत बनला आहे. त्यातून दरदिवशी अनेक लिटर पाणी वाया जात आहे. हा कालवा दुरुस्त करावा यासाठी अनेकवेळा शेतकऱ्यांनी मागणी केली होती. त्या मागणीकडे जलसिंचन खात्याने दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे आज कासारवर्णेत कालवा फुटून पाणी वाया गेलं. भविष्यात जर हा कालवा पूर्णपणे दुरुस्त केला नाही तर अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ शकते.

अग्निशमन दलाच्या जवानांकडून रस्त्याची स्वच्छता
कालवा फुटून कासारवर्णे रस्ता तब्बल अर्धा दिवस धोकादायक स्थितीत होता. वाहनांना ये-जा करण्यासाठी दूरचा रस्ता घ्यावा लागला. रस्त्यावर चिखल झाल्यामुळे अनेक वाहनं रस्त्यावरील चिखलात रुतून राहिली. अखेर जेसीपी घालून चिखल आणि रस्त्यावर वाहून आलेली माती काढावी लागली. रस्ता पूर्णपणे पाणी मारून अग्निशमन दलाच्या जवानांनी स्वच्छ केला. एकीकडे लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही, तर दुसऱ्या बाजूने शेतीसाठी मिळणारे पाणी असे वाहुन जातेय.
