आंबोलीत ‘सुसाईड’चा थरार ; 200 फुट दरीतून युवतीला वाचवलं !

आपत्कालीन व्यवस्थापन कार्यकर्ते आणि रेस्क्यू टीमची कौतुकास्पद कामगिरी

Goan Varta Live | प्रतिनिधी

सावंतवाडी : दरीत कोसळून मृत्यूच्या किंवा आत्महत्येच्या घटनांसाठी आंबोली कुप्रसिद्ध आहे. तिथली अशी कोणतीही बातमी अंगावर शहारे आणणारीच असते. असाच प्रकार आजही घडला. एका युवतीनं अचानक दरीतून खाली उडी टाकली. मात्र अतिशय प्रतिकूल स्थितीत, सुमारे 200 फुट खोल दरीतून या युवतीला वाचवण्यात रेस्क्यू टीमला यश आलं.

आज दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास आंबोली बसस्थानकावरून एका युवतीने संजय पाटील नामक रिक्षाचालकाची रिक्षा सावंतवाडीला जायचे आहे, असे सांगून रिक्षा भाड्याने घेतली.‌ सावंतवाडीच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान, घाटात तिने दरड पडलेल्या ठिकाणी रिक्षा थांबवली व घाटातील नजारा बघावा म्हणून ती घाटातील संरक्षक कठड्यावर चढली. हे बघताच रिक्षाचालकाने तिला खाली उतरण्याची विनंती केली. परंतु तितक्यात तिने चप्पल व ओढणी संरक्षक कठड्यावर ठेवून खाली उडी मारली. ती जवळपास दोनशे फूट खाली कोसळली. हे बघून घाबरलेल्या स्थितीत रिक्षा चालक आंबोली पोलिस ठाण्यात आले. त्यांनी घडलेली घटना आंबोली पोलिसांना सांगितले. त्यानंतर आंबोली पोलिस स्थानक प्रमुख बाबु तेली,‌ दत्तात्रय देसाई व आंबोली मधील रेस्क्यू टीमचे कार्यकर्ते, आपत्कालीन व्यवस्थापन कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. त्यांच्या अथक प्रयत्नानंतर तिला प्रतिकूल परिस्थितीत धोके असतानाही जिवंत व सुखरूप बाहेर काढलं. तात्काळ तिला 108 रुग्णवाहिकामधून आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नेण्यात आले. यावेळी तिचा पायाला व कमरेला दुखापत झाल्याचे समजले‌.

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तिचे नाव कमल रामनाथ ईदे राहणार शिरोडा (वय 24) असल्याचे समजते. अशाप्रकारे आत्महत्येचा प्रयत्न का केला असावा, याबाबतची माहिती मिळू शकली नाही. पोलीस अधिक उपचारानंतर तिची माहिती गोळा करून आत्महत्या करण्याची कारणे काय आहेत याबाबत तपास करणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, पोलीस उपनिरीक्षक तोसिफ्र सय्यद, पोलीस उपनिरीक्षक आनंद यशवंते आदी उपस्थित होते. तर आपत्कालीन बचाव समिती तर्फे ही कामगिरी विशाल बांदेकर, अजित नार्वेकर, उत्तम नार्वेकर, काका भिसे, संतोष पालेकर, राकेश अमृतकर, अमरेश गावडे, दीपक मिस्त्री, हेमंत नार्वेकर, मायकल डिसोजा यांनी पार पाडली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!