कर्नाटकात तिसऱ्या लाटेची चाहूल…

बंगळुरूतील ५४३ मुलांना ऑगस्ट महिन्यात कोरोनाची लागण

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच बंगळुरूतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बंगळुरूतील ५४३ मुलांना ऑगस्ट महिन्याच्या दोन आठवड्यात कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ही मुले १ ते १९ वयोगटातील आहेत. यामुळे कर्नाटक सरकारने तातडीची बैठक बोलवली आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये शाळा सुरु करण्याचे आदेश देण्यात आले होते. कोरोनाचा वाढता फैलाव पाहता पुन्हा एकदा कठोर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

गेल्या ११ दिवसात बंगळुरूत ५४३ मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे बंगळुरू महानगरपालिकेने सांगितले आहे. यातील बहुतेक मुलांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. तर काही जणांमध्ये कोणतीच लक्षणे नाहीत. कुठल्याही प्रकारे गंभीर लक्षणे असलेले लहान मुले रुग्णालयात दाखल झाली आहेत का? याची आम्ही तपासणी करत आहोत. मात्र, या तपासणीत सुद्धा आम्हाला सौम्य आणि अतिसौम्य लक्षणे असलेली लहान मुले आढळली आहेत ज्यांना घरात उपचार देता येईल, बीबीएमपीचे आरोग्यविभागातील विशेष आयुक्त रणदिप. डी. यांनी सांगितले.

कोरोना मुलांपर्यंत पालकांकडून पसरला आहे किंवा मुलांमुळे पालकांना झालेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चाचणी केल्यानंतर, सौम्य लक्षणे असलेल्या मुलांचे प्रमाण जास्त आहे. लहान मुलांचा वावर दुसऱ्या लहान मुलांबरोबर जास्त असतो. त्याचबरोबर ते कोरोनाचे नियम पाळत नाही आणि लसीकरणही झालेले नसल्यामुळे त्यांना धोका सर्वाधिक आहे. यासंदर्भातील माहिती बाल संसर्गजन्य रोगच्या सल्लागार डॉ. अर्चना एम. यांनी इंडिया टूडेला दिली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!