राज्याला ऑक्सिजन प्रकल्प उभारणीसाठी मिळाला होता निधी

पीएम केअरमधून जानेवारीत निधी मंजूर परंतु, प्रकल्प उभारणी नाहीच

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: राज्यात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा याच गोष्टीची मोठी चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजनचा तुटवडा न भासण्यासाठी निर्यात बंद करुन औद्योगिक क्षेत्रातील ऑक्सिजनचा साठा वैद्यकीय सेवेसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून जानेवारी महिन्यातच पीएम केअरमधून गोव्यात दोन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी निधी देण्यात आला होता. जानेवारीपासून प्रकल्प उभारणीकडे लक्ष देण्यात आलं असतं तर आता ऑक्सिजनची कमी भासली नसती.

OXYGEN
OXYGEN

पीएम केअर्समधून राज्यांना प्रकल्प उभारणीचे आदेश

केंद्र सरकारकडून पीएम केअर्स (प्राइम मिनिस्ट सिटीजन असिस्टंस अँड रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन) न्यास निधीअंतर्गत जमा २०१.५८ कोटी रुपये सार्वजनिक आरोग्य सुविधेसाठी देशातील १६२ पीएसए वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना अतिरिक्त हप्ता म्हणून वितरीत करण्यात आलेले आहेत. केंद्रीय वैद्यकीय पुरवठा स्टोअर्सचा १३७.३३ कोटीचा प्रकल्प असून त्यात पुरवठा, प्रकल्पाची स्थापना व व्यवस्थापन शुल्काचा समावेश आहे. या प्रकल्पांच्या दैनंदिन कामकाजाचे व व्यवस्थापनाच्या कार्याची जबाबदारी त्या त्या राज्यांवर होती. करोना महामारीचा काळ असल्याने आरोग्य यंत्रणेला बळकटी देण्यासाठी व योग्य दरात वैद्यकीय ऑक्सिजनची उपलब्धता दीर्घकालावधीसाठी व्हावी, यासाठी पीएम केअर्समधून राज्यांना प्रकल्प उभारणी करण्यास सांगण्यात आले होते. यामुळे परराज्यावरील अवलंबित्वही कमी होणार होते. महाराष्ट्राने दहापैकी केवळ एक प्रकल्प उभारलेला असून गुजरातमध्ये ११ प्रकल्प उभारण्यात आले आहेत.

निर्यात थांबवली

गोव्यात वैद्यकीय ऑक्सिजनची कमी भासू लागल्यानंतर राज्य सरकारने ऑक्सिजन सिलींडर राज्याबाहेर करण्यात येणारी निर्यात थांबवलेली आहे. औद्योगिक ऑक्सिजन प्रकल्पांना वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठा करण्याचे निर्देश दिलेले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून राज्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्याचे आदेश दिल्यानंतर महाराष्ट्र कोल्हापूर येथून ११ टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे. तर केरळमधूनही २० हजार लिटर द्रव ऑक्सिजन आयात केला जाणार आहे.

हेही वाचाः ‘भीक मागा, उधार घ्या, चोरी करा; पण ऑक्सिजन द्याच’

अजूनपर्यंत एकही प्रकल्प गोव्यात नाही

गोव्याला जानेवारी महिन्यातच दोन ऑक्सिजन प्रकल्प उभारणीसाठी निधी देण्यात आला होता. पण अद्यापही राज्य सरकारने त्या निधीतून एकही ऑक्सिजन प्रकल्प उभारलेला नाही. ५ जानेवारी २०२१ रोजीच्या पंतप्रधान कार्यालयाच्या प्रसिध्दी पत्रकानुसार पीएम केअर्सच्या माध्यमातून २०१.५८ कोटी रुपयांचा निधी हा एकूण ३२ राज्यांना मिळून देण्यात आला होता. या निधीव्दारे देशभरामध्ये वैद्यकीय वापरासाठीचे नवे एकूण १६२ ऑक्सिजनचे प्रकल्प उभारणी करण्यात येणार होते. या प्रकल्पांची क्षमता ही १५४.१९ मेट्रीक टन असणार होती. कोणत्या राज्याला किती प्रकल्प उभारायचे आहेत, हे देखील केंद्र सरकारकडून निधी देतानाच स्पष्ट करण्यात आलं होतं. केंद्राकडून गोव्यासाठी एकूण दोन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचे निर्देश होते. पण या दोन प्रकल्पांपैकी जानेवारीपासून अजूनपर्यंत एकही प्रकल्प गोव्यात उभारण्यात आलेला नाही.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!