राज्य सरकारचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर…

गोदामांमध्ये सडलेली 'ती' डाळ कोविड काळातील : मंत्री रवी नाईक

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याच्या राज्यातील अकरा गोदामांमध्ये पडून असलेली सुमारे २५० मेट्रिक टन (२.५० लाख किलो) तूरडाळ खराब झाली आहे. या डाळीची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया खात्याने सुरू केली आहे. परंतु, अन्नधान्याची इतक्या मोठ्या प्रमाणावर नासाडी केल्याचा ठपका ठेवत राज्यभरातील नागरिकांकडून सरकारी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. खराब झालेल्या डाळीची किंमत सुमारे २.७ कोटी रुपये इतकी होते.
हेही वाचा:गॅस सिलिंडरच्या स्फोटात तिघे जखमी…

खात्याच्या संचालकांकडून याबाबत स्पष्टीकरण मागणार

दरम्यान, याबाबत मंत्री रवी नाईकांनी स्पष्टीकरण दिल आहे. ते म्हणाले, जी डाळ नागरी पुरवठा खात्याच्या गोदामांमध्ये सडलीए, ती कोविड काळातील आहे, माझ्या कार्यकाळातील नाही. तरी मी खात्याच्या संचालकांकडून याबाबत स्पष्टीकरण मागणार आहे. या तूरडाळीची विल्हेवाट लावण्यासाठी निविदा मागवल्या आहेत, त्या १६ तारखेला उघडण्यात येतील, असं स्पष्टीकरण नागरी पुरवठा मंत्री रवी नाईकांनी दिलंय.   
हेही वाचा:दोन दिवसांत ६१ मद्यपी चालकांविरोधात कारवाई…

२०२० मध्ये कोविडचा उद्रेक झाल्याने दुकाने बंद

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खराब झालेली २५० मेट्रिक टन तूरडाळ सरकारने कोविड काळात राज्यातील जनतेला वितरित करण्यासाठी सरकारने मागवलेली होती. २०२० मध्ये कोविडचा उद्रेक झाल्याने दुकाने बंद राहिली. त्याच काळात डाळींची किंमत गगनाला पोहोचल्याने गरीबांना डाळी विकत घेणे परवडनासे झाले होते. त्यामुळे केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेद्वारे तांदूळ, गव्हासह तूरडाळही स्वस्त धान्य दुकानांमधून मोफत देण्यास सुरुवात केली. एप्रिल ते जून २०२० या कालावधीत तूरडाळ स्वस्त धान्य दुकानांतून देणे अनिवार्य केले होते. त्यानंतर मात्र स्वस्त धान्य दुकानदारांना तूरडाळ वितरित करणे अनिवार्य नव्हते. अशा स्थितीत काही प्रमाणात दुकानेही खुली झाली. परंतु, वाहतूक व्यवस्था मर्यादित होती. त्यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली. परिणामी, खुल्या बाजारात तूरडाळ प्र​तिकिलो ११२ रुपयांवर गेली होती. कोविडमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. त्यामुळे अनेक कुटुंबांसमोर बिकट आर्थिक परिस्थिती ओढवली होती. अशांना मदतीचा हात देण्यासाठी सरकारने नागरी पुरवठा खात्याद्वारे राष्ट्रीय कृषी को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (नाफेड) महाराष्ट्र विभागाकडून ८३ रुपये प्रतिकिलो दराने ४०० मेट्रिक टन तूरडाळ राज्यात आणून तिची विविध तालुक्यांतील गोदामांत साठवणूक केली. परंतु, त्यावेळी स्वस्त धान्य दुकानदारांना तूरडाळ देणे अनिवार्य नसल्याने ४०० मेट्रिक टनांतील केवळ १५० मेट्रिक टन डाळच स्वस्त धान्य दुकानदारांनी नेली. उर्वरित डाळ २०२० पासून गोदामांतच पडून राहिली. खराब झालेली सुमारे २५० मेट्रिक टन डाळ ही त्यातील असल्याचे खात्याच्या खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.  या प्रकाराची नागरी पुरवठा खात्याने चौकशी सुरू केली आहे.
हेही वाचा:Mock Drill | वाळपई कंदब बसस्थानकात पोलीस कमांडो, दहशतवादी…

विल्हेवाटीसाठी खात्याने मागवल्या निविदा      

गोदामांत पडून खराब झालेल्या तुरडाळीची विल्हेवाट लावण्यासाठी नागरी पुरवठा खात्याने आता सीलबंद निविदा मागवल्या असून, त्यासंदर्भातील जाहिरातही प्रसिद्ध केली आहे. १२ ऑगस्टपर्यंत निविदा भरण्यास मुदत देण्यात आली आहे. तर, १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता निविदा उघडण्यात येणार असल्याचे खात्याने जाहिरातीत म्हटले आहे.
हेही वाचा:Goa Marathi Film Festival | गोवा मराठी चित्रपट महोत्सवात होणार चार प्रिमियर शो…

  

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!