गुंडगिरी संपवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील

सहा महिन्यांत होणार गुंड हद्दपार : मुख्यमंत्री

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यातील गुंडगिरी पूर्णपणे संपवण्यासाठी पोलिस कार्यरत आहेत. खून, खुनाचा प्रयत्न करणाऱ्या गुंडांच्या मुसक्या आवळण्यात येत आहेत. मेरशी, फातोर्डा वा किनारी भागात कार्यरत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत अशा प्रकारच्या प्रकरणातील दोषींना हद्दपार करण्याची प्रक्रिया राज्य सरकारकडून पूर्ण केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

हेही वाचाः खळबळजनक! जीवघेण्या हल्ल्यात कुख्यात गुंड टायगर गंभीर जखमी

गुंडांना हद्दपार करण्यासाठी सरकार प्रयत्नशील

मडगाव रवींद्र भवन येथे एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या मुख्यमंत्र्यांना फातोर्डा येथील गुंडांच्या टोळीयुद्धाबाबत विचारणा केली असता ते बोलत होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मुरगाव, सासष्टी, बार्देश, तिसवाडी तालुक्यांत झोपडपट्टी भागामुळे गुंडगिरी वाढत आहे. गुंडगिरी संपवण्यासाठी व गुंडांना हद्दपार करण्यासाठी राज्य सरकार कार्यरत असेल. अन्वर शेखवरील हल्ला रेती व्यवसायातील स्पर्धेतून घडल्याची चर्चा असून हल्ल्यामागे हाच उद्देश होता का, असा सवाल केला असता, हा हल्ला कशामुळे झाला याची नेमकी माहिती नाही. त्यांच्यातील मारामारी पैशांच्या देवाणघेवाणवरूनही होत असतात, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. गुंडगिरीला लगाम घालण्यात पोलिस कमी पडत आहेत का, अशी विचारणा केली असता पोलिस आपले काम करत आहेत. कडक भूमिका घेण्यासाठी ती प्रकरणे फास्टट्रॅकवर आणावी लागतात, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बायोमिथेनेशनबाबत बैठक होणार : मुख्यमंत्री

बायोमिथेनेशन प्रकल्पाच्या उभारणीबाबत विरोधकांनी विधानसभेत विषय काढल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन १० फेब्रुवारीपूर्वी करण्यात येईल, असं सांगितलं होतं. ही बैठक न झाल्याबाबत विचारणा करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ती बैठक लवकरच बोलावण्यात येणार असून तारीख जाहीर करण्यात येईल, असं सांगितलं.

हेही वाचाः मुख्यमंत्री म्हणतात, कोळसा हाताळणी कमी करणार पण RTIनं समोर आणलं धक्कादायक वास्तव

‘मडगाव अर्बन’च्या खातेदारांनी घेतली भेट

मडगाव अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांनी मडगावात आलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. खातेधारकांना येत असलेल्या अडचणी त्यांनी त्यांच्यासमोर मांडल्या. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मडगाव अर्बन बँकेच्या प्रकरणात सरकार लक्ष देईल. खातेदारांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारकडून सर्व मदत करण्यात येईल, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!