आभाळ फाटलं…धरणीही दुभंगली ; दरडी कोसळून कोकणात 66 जणांचा बळी

रायगड जिल्ह्यात निसर्गाचा कहर

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई : कोरोनाच्या महामारीतच निसर्गाच्या रौद्र रूपाने गेल्या काही दिवसांत माणसाच्या दु:ख सोसण्याच्या सहनशक्तीची, संकटाशी झुंजण्याच्या त्याच्या धैर्याची आणि अखेर जगण्यासाठी पुन्हा उभे राहण्याच्या त्याच्या धडपडीची परीक्षा घेतली. आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळला. त्याने दरडींचा कडेलोट केला आणि त्यात सुमारे ६६ नागरिकांचा बळी गेला. ही दुर्दैवी घटना घडलीय कोकणात.

अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील तळये गावावर शोककळा पसरली आहे. तेथे गुरुवारी दरड कोसळली. या दुर्घटनेत ३८ नागरिकांचा मृत्यू झाला, तर किमान ४० ग्रामस्थ मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.  दुसरी दरड दुर्घटनाही रायगड जिल्ह्यातील  पोलादपूर तालुक्यात घडली. केवनाळे आणि गोवेले सुतारवाडी येथे दरडी कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला. त्यात केवनाळे येथील सहा, तर सुतारवाडी येथील पाच जणांचा समावेश आहे. या दुर्घटनेतील बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू आहे.

रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील बिरमणी आणि पोसरे या गावांतही दरडी कोसळून चौघांचा मृत्यू झाला, तर १८ ग्रामस्थ बेपत्ता आहेत. ते दरडींच्या ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे.

पश्चिम घाट क्षेत्रात गेल्या ३६ तासांपासून कोसळणाऱ्या धुवाधार पावसाने सातारा जिल्ह्यात दरडी कोसळण्याच्या आणि डोंगर भूस्खलनाच्या १२ दुर्घटना घडल्या. दरडींखाली घरे गाडली गेल्याने आठ जणांचा मृत्यू झाला असून १५ हून अधिक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे.

रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील तळये गावावर गुरुवारी दुपारी ४ वाजता अक्षरश: डोंगर कोसळला. दोन दिवस महाड परिसरात अतिवृष्टी सुरू होती. अतिवृष्टीमुळे गुरुवारी वरंध घाट परिसरातील तळये गावातील कोंडाळकर वाडीवर दरड कोसळली आणि ३५ पैकी ३२ घरे गाडली गेली. पूरपरिस्थिती आणि संपर्क यंत्रणा कोलमडल्याने दुर्घटनास्थळी वेळेवर मदत पोहोचू शकली नाही. मदतकार्य शुक्रवारी सकाळी पुराचे पाणी ओसरू लागल्यानंतर सुरू करण्यात आले.

सकाळी १०च्या सुमारास ‘एनडीआरएफ’ची पथके दाखल झाली. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ३८ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. आणखी ३४ जण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. मुसळधार पावसामुळे मदत आणि बचावकार्यात अडथळे येत आहेत. दरम्यान, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी करून मदत आणि बचावकार्याचा आढावा घेतला.

रायगड जिल्ह्याच्या पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, गोवेले सुतारवाडीतही गुरुवारी रात्री १०च्या सुमारास दरडी कोसळल्या. त्यांत केवनाळे येथील सहा, तर सुतारवाडी येथील पाच जण दगावले. सुतारवाडीतील दहा घरे भुईसपाट झाली आहेत. केळवली येथे रात्री साडेआठच्या सुमारास दरड कोसळली. जखमी झालेल्या १३ जणांना पोलादपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. २४ तासांत पोलादपूर परिसरात ३०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे नद्या-नाले पात्र सोडून वाहात होते. कापडे ते कामथे बोरघर रस्त्यावरील खांबेश्वरवाडीला जोडणारा पूल आणि साखर बोरज येथील पूल वाहून गेला आहे.

तळये गावातील कोंडाळकर वाडीवर कोसळलेल्या दरडीचा ढिगारा एक किलोमीटरपर्यंत पसरला आहे. तो उपसून बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्याचे काम पुढील काही दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे.

सातारा जिल्ह्यालगतच्या पश्चिम घाट क्षेत्रात तीन दिवसांपासून तुफान पाऊस कोसळत असून गुरुवारपासून पाटण, जावली, वाई, महाबळेश्वर तालुक्यात १२ दुर्घटना घडल्या. त्यात आठ जणांचा मृत्यू झाला. वाई तालुक्यातील देवरुखवाडी, जावळी तालुक्यातील रेंगडीवाडी, पाटण तालुक्यातील आंबेघर, मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी, कोयनानगर, किल्ले मोरगिरी, टाळेवाडी, गुंजाळी, काठेवाडी, मेष्टेवाडी, टोळेवाडी, जितकरवाडी, कामगारगाव आदी ठिकाणी डोंगराचा भाग खचून त्याखाली काही घरे गाडली गेली आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!