‘हापूस’चा हंगामच झाला ‘भुईसपाट’

वादळानं आंबा बागा झाल्या उध्वस्त..शंभर कोटींच्या नुकसानीची भीती !

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : पहिल्या हंगामात फारसे उत्पादन नसल्यामुळे शेवटच्या हंगामावर भिस्त ठेवलेले कोकणातील आंबा बागायतदार तौक्ते चक्रीवादळात पूर्णत: नेस्तनाबूत झाले आहेत. चक्रीवादळाने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमधील आंबा बागायतदारांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेलाच, पण उत्पन्न देणारी झाडेही उन्मळून पडली आहेत. या दुहेरी अस्मानी संकटामुळे बागायतदारांचे तब्बल १०० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

शंभर कोटींच्या नुकसानीची भीती

मेच्या दुसऱ्या आठवडय़ापासून खऱ्या अर्थाने शेवटच्या हंगामातील हापूस आंबा काढून मुंबई, पुण्याच्या बाजारात पाठविला जात असल्याने बागायतदारांना उत्पन्नाची संधी असते, मात्र शेवटच्या हंगामातील हापूस घाऊक बाजारपेठेत पाठविण्याच्या काळातच चक्रीवादळाने तडाखा दिल्याने बागायतदारांचे सुमारे १०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

15 ते 31 मे दरम्यान जास्त उत्पादन मिळण्याची होती शक्यता !

यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच वातावरणातील बदलांमुळे मार्चमध्ये येणारे पहिल्या टप्प्यातील आंबा उत्पादन फारसे आलेच नाही. त्यामुळे हंगाम लांबला. १० एप्रिलपासून बाजारात खऱ्या अर्थाने हापूस आंबा दिसू लागला होता. गेल्या १५ दिवसांत वाशी बाजारातही रत्नागिरी जिल्ह्यातून दिवसाकाठी ३० हजार पेट्या जात होत्या. मोहोर उशिरा आल्याने १५ ते ३१ मे या कालावधीत जास्त उत्पादन हाती येईल, अशी शक्यता होती. हा शेवटच्या टप्प्यातील आंबा जास्त प्रमाणात तयार होत होता; पण वादळाने होत्याचे नव्हते केले आहे. गेल्या वर्षी मोहोर लागण्याच्या काळात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने मोहोर गळून पडला होता. त्यामुळे दुसऱ्यांदा मोहोर आणि फळधारणा होताना जानेवारी-फेब्रुवारी उजाडला. त्यामुळे हापूसचा हंगाम यंदा लांबणीवर पडणार असे स्पष्ट दिसत होते. त्यातच वादळाचं संकट आलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!