तळर्ण रस्ते उखडले, प्रशासनाचा पत्ताच नाही

पूर ओसरून चार दिवस झाले तरीही तळर्ण भागातील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी कोणीच फिरकले नसल्याची नागरिकांची तक्रार

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणे: गुरुवारी पहाटे पेडणे तालुक्यातील शापोरा आणि तेरेखोल या दोन्ही नद्याना पूर येऊन लाखो रुपयांचं वैयक्तिक तसंच सार्वजनिक पातळीवर नुकसान झालं. वीज खांब, रस्ते, मिनी पूल, घरे, भात शेती, बागायती यांचं  मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. पूर ओसरून चार दिवस झाले तरीही तळर्ण भागातील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी कोणीच फिरकले नाही.

पूर ओसरला मात्र खुणा कायम

पूर ओसरला मात्र खुणा कायम राहिल्या आहेत. तळर्ण येथील अंतर्गत २० मीटर रस्ता पूर्णपणे उखडून गेला आहे. या परिसरात एक मिनी पूल आहे, त्या पुलाच्या खाली दोन पाईप घातलेले होते. त्यातून पाणी सरळ गेलं नाही. त्यामुळे परिसरातील पाणी पूर्णपणे रस्त्यावर आलं. पाणी जात नसल्यानं रस्त्याला त्याचा फटक बसला. २० मीटर लांबीचा रस्ता पूर्णपणे उखडून गेला.

आमदार मंत्र्यांनी ना भेट दिली, ना चौकशी केली

तळर्ण भागात आजपर्यंत आमदार, मंत्री किंवा आपत्कालीन सरकारी यंत्रणेनं भेट देऊन आमची साधी चौकशीही केली नाही, अशी तक्रार स्थानिकांनी केली. रस्ता उखडून गेला त्यामुळे या रस्त्यावरून वाहनं कशी चालवणार? असा प्रश्नही स्थानिकांनी उपस्थित केलाय. या रस्त्याची पाहणी पेडणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी करावी, अशी मागणी राजन कोरगावकरांनी केली आहे.

आमदार मंत्र्यानी आमच्याकडे का पाठ फिरवली?

येथील नागरिकांचे म्हणणं आहे ज्या दिवशी पूर आला, त्या दिवशी ते आजपर्यंत कुणीच या भागाला भेट दिली नाही. केवळ ‘मिशन फॉर लोकल’चे नेते राजन कोरगावकर यांनी या भागाला भेट देऊन आमची विचारपूस केली. शिवाय कोणत्या प्रकारच्या मदतीची गरज आहे हे जाणून घेतलं. मात्र आम्ही निवडून दिलेले आमदार-मंत्री फिरकले नाहीत. मंत्री बाबू आजगावकर शुक्रवारी आले. ते कुठे येऊन गेले हे आम्ही दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्र वाचलं तेव्हा समजलं. आमदार मंत्र्यानी आमच्याकडे का पाठ फिरवली? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | LANDSCAM | बार्देश, तिसवाडीतील जमीन घोटाळा उघड

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!