पावसामुळे केळावडे पुलाचा रस्ता खचला

त्वरित दुरुस्तीची मागणी; सार्वजनिक बांधकाम खात्याने केली पाहणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

सत्तरीः केळावडे रावण येथील ‘साटयेचो हरल’ पुलाचा रस्ता दोन दिवसांपूर्वी पाण्याखाली गेल्याने या रस्त्यावरची वाहतूक बंद होती. पण शुक्रवारी पूल खचला असून सार्वजनिक बांधकाम खात्याने पाहणी केली. असाच जर पाऊस पडत राहिल्यास पुलाचा रस्ता अजून खचण्याचा तसंच वाहून जाण्याची शक्यता आहे. तेव्हा त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जातेय.

हेही वाचाः Corona Vaccine | 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना दिलासा

रस्त्याच्या बाजूला पडलं भोक

दरम्यान दोन दिवसांपूर्वी पडत असलेल्या पावसामुळे या पुलावरुन पाणी वाहत होतं. त्यामुळे हा रस्ता आणखी कमकुवत झाला आणि रस्त्याच्या कठड्याची आणि रस्त्याखालील माती वाहून जायला सुरुवात झाली. त्यामुळे या रस्त्याखालील बरीच माती वाहून गेल्याने रस्त्याबाजूने मोठं भोक पडलं आहे. त्यामुळे हा रस्ता अधिक धोकादायक बनला आहे. दरम्यान घोटेली नं २ ते केळावडे मार्गावर हा पूल आहे. जर हा रस्ता खचला तर या मार्गावरील वाहतूक बंद होईल आणि त्याचा परिणाम या दोन्ही गावातील नागरिकासहित या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना होईल. तसंच केरीतून तळेखोल- दोडामार्गला जाण्यासाठी या मार्गाचा अवलंब केला जातो. त्यामुळे याचा परिणाम आंतरराज्य वाहतुकीवर पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.

अधिकाऱ्यांनी केली पाहणी

दरम्यान शुक्रवारी संध्याकाळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंता देवेंद्र वेलींगकर आणि कनिष्ठ अभियंता झिलबाराव राणे यांनी घटनास्थळी भेट देऊन खचलेल्या पुलाची पाहणी केली. तसंच खचलेल्या पुलाची दुरुस्तीची प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली जाईल असं सांगण्यात आलंय.

हेही वाचाः अवैध दारू पकडली; पत्रादेवी येथे कारवाई

पुलाची उंची वाढवण्याची गरज

दरम्यान हा पूल सिमेंटच्या पाईपवर उभारला असून त्याची उंची कमी आहे. पुलाची उंची कमी असल्यानं मोठ्या पावसात या पुलावरुन पाणी जातं. दोन दिवसांपूर्वी पुलावरून बराच वेळ पाणी वाहत होतं. त्यामुळे पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी वारंवार होत आहे. आता या पुलाचा रस्ता खचल्यानं पुलाची उंची वाढवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | FAKE ID | फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना सावधान!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!