पत्रादेवी ते कोलवाळ पूलापर्यंतचा रस्ता अत्यंत धोकादायक

ठिकठिकाणी काम सुरू मात्र दिशाफलकांचा पत्ता नाही

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः पत्रादेवी ते धारगळ महाखाजन कोलवाळ पूलापर्यंतचा राष्ट्रीय  महामार्ग अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. ज्या ठिकाणी काम चालू आहे तिथे कोणत्याच प्रकारचे दिशा फलक नाहीत. रात्रीच्या वेळी रेडीयम असलेले दिशाफलक स्पष्ट दिसत नसल्याने अपघातांचं प्रमाण वाढलंय. रविवारी मालपे रस्त्याचं काम सुरू असलेल्या ठिकाणी एका ट्रकला अपघात झाला. या अपघातात ट्रकचं बरंच नुकसान झालंय, असं विर्नोडा माजी सरपंच सीताराम परब यांनी सांगितलंय.

हेही वाचाः ‘फिश हेड’ न वाढल्यानं लग्नमंडपातच ‘फ्री स्टाईल’

या रस्त्याचं काम जीएमआर कंपनीला मिळालेलं आहे. स्वाभिमानी पेडणेकरांनी या ठेकेदाराच्या विरोधात आवाज उठवून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र झोपेचं सोंग घेतलेल्या प्रशासनाला जाग आली नाही. म्हणून स्वाभिमानी पेडणेकरांनी थेट न्यायालयात धाव घेत ठेकेदाराविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी याचिका दाखल केलीये. न्यायालयाने या याचिकेची दाखल घेऊन पेडणे पोलिसांना या ठेकेदाराविरोधात पहिला गुन्हा नोंद करण्याचा आदेश दिलाय. मात्र आजपर्यंत ती एफआयआर नोंद झाली की नाही याविषयी पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांच्याकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद मिळाला, असं परब म्हणाले.

हेही वाचाः रॉय फर्नांडिस यांच्यावर जीवघेणा हल्ला

एमव्हीआर ठेकेदाराची मनमानी

एमव्हीआर ठेकेदाराची अजून मनमानी चालूच आहे. रस्त्याचं काम करत असताना प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ज्या उपाय योजना केल्या पाहिजे त्यांचा या रस्त्यावर अभाव आहे. त्यामुळे आजही या धोकादायक रस्त्यावर अपघात होतात. सरकारने निदान आता तरी या रस्त्याकडे गांभीर्याने पहावं, अशी मागणी परबांनी केलीये. रस्त्याचे काम सुरू आहे ते अत्यंत बेजबाबदारपणे चालू आहे. कोणत्याच ठिकाणी दिशाफालक आणि रात्रीच्यावेळी रेडियम नसल्याने वाहनचालक गोंधळून जातात आणि मग अपघात घडतात, असं सीताराम परब म्हणाले.  

हेही वाचाः भाजप मंडळ आंदोलन करणार, तर पेडणे ‘मगोप’चा पूर्ण पाठिंबा

न्यायालयाकडून गुन्हा नोंद करण्याचे आदेश

मांद्रे येथील युवा वकील प्रसाद शहापूरकर यांनी पेडणे पोलिसांना १२ जुलै रोजी या रस्त्याविषयी तक्रार नोंद करावी म्हणून लेखी तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी त्या कंत्राटदारावर आजपर्यंत गुन्हा नोंद केलेला नव्हता. त्या अनुषंगाने पेडणे न्यायालयात प्रसाद शहापूरकर यांनी अर्ज करून या कंत्राटदारच्या विरोधात पेडणे पोलिसांनी गुन्हा नोंद करण्याचा आदेश न्यायालयाने द्यावा त्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार २५ रोजी न्यायालयाने पोलिसांना मेसर्स एम.व्ही.आर ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला होता.

हेही वाचाः सतत, अविरत चलना है!

पोरस्कडे रेती उपसाचे परिणाम

राष्ट्रीय महामार्ग ६६ जवळच पोरस्कडे तेरेखोल नदीत मोठ्या प्रमाणात  रेती उपसा चालू केल्यामुळे तेरेखोल पात्रात जबरदस्त खोली निर्माण झाली आहे. परिणामी पावसाळ्यात १०० मीटर रस्ता संरक्षण भिंतीसहित पाण्यात गेला आणखी ४०० मीटर रस्त्याला धोका निर्माण झाला. ठिकठिकाणी आजही भगदाडे आणि रस्त्याला तडे गेल्याचं चित्र दिसत आहे. मुळात उगवे गावापासून ते कोनाडी कोरगावपर्यंत रेती उपसाचं प्रकरण शासनाने तातडीने थांबवायला पाहिजे. कारण या प्रकारामुळे सातार्डा-न्हयबाग रेल्वे पुलाला धोका निर्माण झाला आहे. अमई डोंगरावर वीस मीटरहून जास्त खाली खोलदरीत रस्ता नवीन काढलेला आहे. परिणामी कधी नव्हे तो पेडणे रेल्वे बोगदा कोसळला. या खोदकामाचा ना हरकत दाखला नगरनियोजन खात्याकडून दिला होता का, किंवा पर्यावरणाचा दाखला होता का, याचाही खुलासा सरकारने करण्याची गरज आहे.

हेही वाचाः …अन् फुटबॉलच्या मैदानावरच एरिक्सननं जिंकला ‘गेम ऑफ लाईफ ‘

मालपे जंक्शन

मालपे जंक्शनवर ५ पोट रस्ते अस्तित्वात आहेत. आता तिथे भगदाड घालून सर्व्हिस रोड करण्याचं काम सुरू आहे. भविष्यात या ठिकाणी पाणी भरून पेडणे गावाचा संपर्क तुटणार आहे, अशी भीती नागरिकांनी  व्यक्त केली आहे. सध्या या ठिकाणी वारंवार अपघात घडत असतात. सध्या हा रस्ता चिखलमय झाला आहे.

हेही वाचाः तीन अर्भकांचा तपास अजूनही गुलदस्त्यात

नको तिथे उड्डाणपूल

नको त्या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात येत आहेत. सरकारी कॉलेज विर्नोडा या ठिकाणी गरज नसताना उड्डाणपूल उभारलेला आहे. विद्यार्थ्यांना मालपे किंवा विर्नोडा जंक्शनवर उतरून कॉलेजकडे जावं लागणार आहे. विर्नोडा जंक्शन पावसाळ्यात जलमय होईल अशी भीती व्यक्त केली आहे. या संपूर्ण रस्त्याला धोका निर्माण झाला असून सरकारने खुलासा करावा, अशी मागणी नागरिक करत आहे. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!