नाणूस ते गांजे खोदलेला रस्ता धोकादायकच

अनेक ठिकाणी रस्ता खचला; मोठा उपघात होण्यापूर्वी उपाययोजना आवश्यक

Goan Varta Live | प्रतिनिधी

वाळपई: ओपा पाणी प्रकल्पापर्यंत गांजे येथील म्हादई नदीचे पाणी नेण्यासाठी गांजे ते ओपा पाणी प्रकल्पादरम्यान मोठी पाईपलाइन घालण्याचं काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून गांजे ते नाणूस चढावादरम्यानचा रस्ता अर्धा अधिक खोदण्यात आला होता. या खोदलेल्या रस्त्यामुळे वाळपई फोंडा मार्गावरुन वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता. दरम्यान खोदलेला रस्ता दगड टाकून बुजवण्यात आला. परंतु हे काम एवढ्या घाईगडबडीत उरकण्यात आलं की ते व्यवस्थित झालं नाही आणि आता जागोजागी हा रस्ता खचला आहे. यामुळे याठिकाणी मोठा अपघात होण्याअगोदर उपाययोजना करण्याची मागणी या भागातून होतेय.

हेही वाचाः नारळाच्या उत्पादनात गोवा आत्मनिर्भर आहे का ?

रस्ता पूर्णपणे चिखलमय

गांजे ते उसगाव चढावाचा रस्ता पूर्णपणे या पाण्याच्या पाईपलाइन टाकण्याच्या कामामुळे पूर्णपणे खराब झाला आहे. त्यामुळे या भागातून प्रवास करणं जिकीरीचं बनलंय. सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतर असलेला हा रस्ता नाणूस येथूनच चिखलमय बनलाय, तो थेट गांजे येथे ज्या ठिकाणी हा प्रकल्प उभारलाय तिथपर्यंत. दरम्यान या भागातून होणारी टिप्पर ट्रकची अविरत वाहतूक अधिक रस्ता चिखलमय बनण्यास कारणीभूत ठरतेय, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. पंधरा सोळा टन माल घेऊन या भागात ट्रकांची वाहतूक सुरू असल्याने या रस्त्याची अधिक दुर्दशा झालीये.

हेही वाचाः कुंकळ्ळीचं राजकारण गलिच्छ पातळीवर

कंत्राटदाराचा हलगर्जीपणा

सार्वजनिक बांधकाम खात्याकडून‌ मिळालेल्या माहितीनुसार या रस्ता दुरुस्तीची कामाची ऑर्डर दीड महिन्यांपूर्वी मिळाली होती. त्यामुळे कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे आज या रस्त्याची ही स्थिती झालीये. या ठिकाणी एखादा अपघात घडला, तर कंत्राटदारावर कारवाई होणार का? असा सवाल या भागातील नागरिक उपस्थित करू लागलेत. एकदम तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या कामगारांना घेऊन कंत्राटदार काम करताना काही दिवसांपूर्वी दिसत होते. फक्त दगड मांडून त्यावर रोडरोलर चावण्याचं काम कंत्राटदारातर्फे करण्यात येत होतं.

हेही वाचाः मराठी सण परंपरेत काय आहे वटपौर्णिमेचं महत्व…

लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष

उसगाव भाग हा वाळपई मतदारसंघात येतो आणि वाळपई मतदारसंघातील गुळेली, खोतोडे, सावर्डे, तसंच वाळपई नगरपालिका येथील बहुसंख्य लोक या रस्त्याचाच अधिक वापर फोंडा, मडगावला जाण्यासाठी करतात. त्यामुळे या भागाचे आमदार या नात्याने सदर रस्त्याचं काम का झालं नाही याची चौकशी करायला पाहिजे होती. मात्र रस्त्याची एकूण स्थिती पाहता या रस्त्याला आणि त्यावरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना कोणी वालीच राहिला नाही, अशी एकूण स्थिती दिसतेय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!