आयपीएलचे उर्वरित सामने आता ‘यूएई’मध्ये होणार !

31 सामने सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान खेळवण्यात येणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कोरोनामुळे स्थगित झालेल्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं मोठा निर्णय घेतलाय. आयपीएलचे उर्वरित सामने आता संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईमध्ये होणार आहेत. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबतची माहिती दिली.

आयपीएलचे 31 सामने उरले आहेत. हे सामने आता सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान यूएईमध्ये खेळवण्यात येणार आहेत. मागील वर्षी म्हणजेच IPL 2020 ची संपूर्ण स्पर्धाही यूएईमध्येच खेळवली होती. यंदा आयपीएलचे सामने भारतात खेळवण्यात आले. मात्र कोरोनाची दुसरी लाट आल्यानं ऐन रंगात आलेली आयपीएल स्पर्धा 4 मे रोजी स्थगित करण्यात आली होती. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आज विशेष कार्यकारिणीचं आयोजन केलं होतं. या बैठकीकडं क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं होतं. इंडियन प्रिमीयर लीगचे उर्वरीत सामने कधी होणार? याची उत्सुकता होती. अखेर हे सामने यूएईला होणार असल्याचं स्पष्ट झालंय. बीसीसीआयनं आजच्या बैठकीत भारतातील कोरोना परिस्थितीसह हवामानाच्या मुद्यावरही चर्चा केलीय. आयपीएलचे उर्वरित 31 सामने सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान घेणार आहेत. यादरम्यान भारतात पावसाचं वातावरण असल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

एकाच दिवसात आयपीएलशी संबंधित 10 जण आणि एक स्टेडियम कोरोनाच्या विळख्यात सापडलं होतं. कोरोनानं आधी केकेआर मग चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये प्रवेश केला होता. दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमच्या ग्राऊंड स्टाफमधील पाच कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. 3 मे रोजी एकाच दिवसात आयपीएलशी संबंधित 10 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं आयोजकांच्या चिंता वाढल्या होत्या. याआधी गेल्या वर्षी 2020 मध्ये चेन्नईच्या सपोर्ट स्टाफमधील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. सध्या आयपीएलचा अर्धा टप्पा पूर्ण झाला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!