स्थानिकांना नको असल्यास प्रकल्प आणू देणार नाही

आमदार सोपटेंचा इशारा; मोरजी, तुये, पार्सेचा शापोरा नदीतील तरंगत्या जेटीला विरोध

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः जर स्थानिकांना प्रकल्प नको असेल तर कोणत्याही परिस्थितीत तो आणू देणार नाही, असा इशारा आमदार दयानंद सोपटेंनी शापोरा नदीतील तरंगत्या जेटीविषयी बोलताना दिला. सध्या शिवोलीच्या बाजूने शापोरा नदीत असलेली तरंगती जेटी तेथून हलवून ती चोपडेत उभारण्याचा प्रयत्न चालू आहे. आगरवाडा पंचायतीकडे परवानगीसाठी लेखी पत्र आल्यानं पंचायत मंडळ, नागरिक खळवलेत आणि या जेटीला तीव्र विरोध करण्याचा निर्धार त्यांनी केलाय.

शिवोली शापोरा नदीत मागच्या दोन दिवसांपूर्वी एक तरंगती जेटी उभारण्यात आली होती. त्या जेटीला शिवोली भागातील नागरिकांनी तीव्र विरोध केल्यानंतर जेटी कंत्राटदराने चार दिवसात ही जेटी तेथुन हलवून चोपडेत स्थलांतरित करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार 3 जून रोजी आगरवाडा पंचायतीकडे चोपडे शापोरा नदीत जेटी उभारण्यासाठी लेखी परवानगी मागणारं पत्र सादर केलं. हे पत्र कॅप्टन ऑफ पोर्टने दिलं आहे. चोपडेतील शापोरा नदीत तरंगती जेटी उभारण्यात येणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी गोवा फॉरवर्डचे नेते दीपक कलंगुटकर, मोरजी जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर, आगरवाडा माजी सरपंच अमोल राऊत, माजी उपसरपंच रवींद्र राऊत, टॅक्सी व्यावसायिक संजय कोले, स्थानिक हेमंत चोपडेकर घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचाः रुग्णवाढीला ब्रेक! मात्र आता तिसऱ्या लाटेसह ‘या’ 6 प्रश्नांसाठी सरकारचा काय प्लान?

स्थानिकांचा विरोध असल्यास प्रकल्प नको

जर स्थानिक पंचायत तसंच स्थानिकांना हा प्रकल्प नको असेल, तर तो त्यांच्यावर लादला जाणार नाही. मी स्थानिकांसोबत आहे. स्थानिकांचा विरोध असलेल्या प्रकल्पाला माझा पाठिंबा नाही. त्या प्रकल्पात कितीही मोठी व्यक्ती गुंतलेली असली तरी मी स्थानिकांबरोबरच असणार. मी कॅप्टन ऑफ पोर्टकडे संपर्क साधला तेव्हा सागरमाला अंतर्गत राज्यात चार जेटी उभारण्यात येणार आहे असं मला सांगण्यात आलं. या जेटी उभारण्यास माझी आपली हरकत नाही. मात्र जिथे स्थानिकांचा विरोध होतो तिथे ती उभारू नये असं मला वाटतं, असं आमदार सोपटे म्हणाले.

sopte
आमदार दयानंद सोपटे

नको असलेले प्रकल्प आमच्यावर का लादले जातात?

शिवोलची जेटी चोपडेत आणली जातेय आणि त्याविषयी स्थानिकांना कोणतीच कल्पना नाही. ही जेटी का येते, त्याची कारणं काय, कोण उभारतोय, त्यातून कसला व्यवसाय होणारेय, त्याचा स्थानिकांना काय फायदा होईल याची कसलीच माहिती स्थानिकांना नाही. सध्या ती तरंगती असेल. कालांतराने ती कायमस्वरूपी होऊ शकते. स्थानिकांच्या कित्येक वर्षांच्या मागण्या आहेत. शापोरा नदीकिनारी जुने जेटी धक्के आहेत, ते कोसळून गेलेत. ते बांधण्याची गरज आहे. ज्याची मागणी नाही ते प्रकल्प का लादले जातायत? आरोग्य खात्याचं हॉस्पिटल आहे, पेडणे कोविड सेंटर आहे तिथे सुधारणा घडवून आणण्याची गरज होती. प्रत्येकवेळी नको असलेले प्रकल्प पेडणेकरांवर का लादले जातात? अगोदरच पेडणेतील जनतेच्या सरकारी प्रकल्पासाठी जमिनी गेल्यात. इतर ठिकाणी जे प्रकल्प झिडकारले जातात ते प्रकल्प आमच्या पेडण्यातच कशाला? पारंपरिक व्यवसायासाठी सरकारने अगोदर चालना द्यावी, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे नेते दीपक कळंगुटकरांनी केलीये.

दिपक कळंगुटकर

पारंपरिक मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्यांवर जेटीमुळे परिणाम

जर या जेटीला शिवोली भागातून विरोध होतो, तर मग मोरजी, आगरवाडा, पार्से पंचायत आणि नागरिक या प्रकल्पाचं स्वागत करतील असं सरकारला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. या जेटीला आमचा विरोध आहे. कोणत्याही स्थितीत आम्ही या जेटीला चोपडे भागात आणू देणार नाही. वेळ प्रसंगी तीव्र विरोध करणार. पारंपरिक मासेमारी करणाऱ्या स्थानिकांच्या व्यावसायिकावर या जेटीमुळे परिणाम होणार आहे, असं मोरजी जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर म्हणाले.

सतीश शेटगावकर

किती फायदा, किती नुकसान याची माहिती द्या

नागरिकांना नको असलेले प्रकल्प त्यांच्यावर लादू नका. या जेटीचा स्थानिकांना किती फायदा आणि किती नुकसान होणार आहे, याची अगोदर माहिती द्या, असं आगरवाडाचे माजी उपसरपंच रवींद्र राऊत म्हणाले.

रवींद्र राऊत

तरंगती जेटी भविष्यात कुठेही जाऊ शकते

स्थानिकांचा या जेटीला विरोध आहे. ही जेटी तरंगती असल्यानं भविष्यात ती कुठेही नेऊ शकतात. या नदीत पारंपरिक पद्धतीने मासेमारी केली जाते. त्यावर या जेटीचा मोठा परिणाम होऊ शकतो, असं आगरवाडाचे माजी सरपंच अमोल राऊत म्हणाले.

अमोल राऊत

जेटी इतरत्र हलवावी

आमचे गावचे पंच नितीन चोपडेकर यांनी या जेटीला विरोध करण्यासाठी पंचायतीला पत्र दिलं. या जेटीला आमचा विरोध आहे. जेटी द्यायची असेल तर स्थानिक मासेमारी करतात त्यांना द्या. कॅप्टन ऑफ पोर्ट्सचे मंत्री मायकल लोबो यांनी त्वरित ही जेटी इतरत्र हलवावी, अशी मागणी चोपडे गावचे नागरिक हेमंत चोपडेकरांनी केली.

हेमंत चोपडेकर

स्थानिकांना विश्वासात घेतलं नाही

या जेटीला आमचा तीव्र विरोध आहे. स्थानिकांना विश्वासात न घेता दिल्लीच्या व्यावसायिकांवर हे सरकार आहे का?  डोंगर संपले, जमिनी गेल्या, आता नद्याही त्यांच्या घश्यात घालणार का? असा सवाल स्थानिक व्यावसायिक संजय कोले यांनी उपस्थित केला.

संजय कोले

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!