समुद्रकिनाऱ्यावरील टारबॉल समस्येचं वैज्ञानिकदृष्ट्या निराकरण करावं

'गोंयचो आवाज'चे पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल यांना आवाहन

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः गोंयचो आवाज पक्षाने राज्यातील समुद्र किनाऱ्यांवर टारबॉलच्या (तेलगोळे) उपद्रवाबाबत राज्य सरकारच्या असमाधानकारक आणि अवैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल खेद आणि चिंता व्यक्त केली आहे. गोव्याच्या संपूर्ण किनारपट्टीवर याचा परिणाम झाला आहे. हे टारबॉल हेच सूचित करतात, की या पर्यावरणीय विनाशाचे मूळ असलेले जहाज संपूर्ण किनारपट्टीवर फिरले, जहाजातील घाण समुद्रात सोडली, ज्यामुळे गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांसाठी एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

पुन्हा एकदा प्रमोद सावंत सरकारमधील मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तींची अकार्यक्षमता दिसली

समुद्रकिनारे हे राज्यातील पर्यटन उद्योगाचे मुख्य स्रोत आहेत. नीलेश काब्राल यांच्या नेतृत्वाखालील गोव्याचे पर्यावरण खाते अशा प्रकारची आपत्ती टाळण्यास आणि कमी करण्यास आवश्यक उपायांबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचं दिसून येत आहे. पर्यावरण मंत्र्याकडून अपेक्षित असलेल्या जलद आणि निर्णायक कारवाईऐवजी, त्यांनी केवळ केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला पत्र लिहून आणि तेलाच्या स्त्रोताचा अंदाज लावून या समस्येपासून आपले हात धुतल्याचं स्पष्ट होतं. दुर्दैवाने, या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रमोद सावंत सरकारमधील मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तींची अकार्यक्षमता आणि अज्ञान दिसून आलं आहे. गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक हे केंद्र सरकारमध्ये जहाज बांधणी राज्यमंत्री आहेत आणि समुद्रातील हा स्त्राव स्त्रोत ओळखण्यासाठी त्यांची मदत घेतली गेली पाहिजे.

यामुळे जहाजाच्या गळतीचे प्रमाण कळलं असतं

गोवा सरकारने या प्रकरणात पुढाकार आणि सक्रिय कृती दर्शविली असती, तर ते अधिक उपयोगी ठरले असते. राज्य सरकार डीजी शिपिंगशी संपर्क साधू शकले असते आणि उपग्रह ट्रॅकिंगद्वारे पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागाराला मदतीसाठी विचारू शकले असते. यामुळे जहाजाच्या गळतीचे प्रमाण आणि त्याच्या हालचाली कळल्या असत्या, ज्यातून कदाचित पर्यावरणाचं आणखी नुकसान होण्यापासून रोखण्यास, पावलं उचलली जाऊ शकली असती, याकडे ‘गोंयचो आवाज’चे संयोजक कॅप्टन विरिएतो फर्नांडिस यांनी लक्ष वेधलं.


ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!