अटल सेतूवर कोसळलेला विजेचा खांब पर्रीकरांच्या भ्रष्ट राजकारणाचा परिणाम

काँग्रेसचे प्रवक्ते तुलियो डिसोझा यांची टीका

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: अटल सेतूवर कोसळलेला विजेचा खांब हे भाजपच्या भ्रष्ट राजकारणाचंच स्मारक असून, दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं प्रशासन किती भ्रष्ट होतं याचंच दर्शन यातून होतं, अशी खरमरीत टीका काँग्रेसचे प्रवक्ते तुलियो डिसोझा यांनी केली. 

हेही वाचाः CORONA UPDATE | देशात नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट

कोसळलेला खांब हे याच भ्रष्टाचाराचं फलित

मांडवी नदीवरील तिसऱ्या पुलावरील विजेच्या खांबामध्ये ४५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं काँग्रेसने निदर्शनास आणलं होतं. आज कोसळलेला खांब हे याच भ्रष्टाचाराचं फलित आहे. भ्रष्ट आणि यु-टर्न मास्टर दिवंगत मनोहर पर्रीकर यांचा वारसा पुढे नेणारे हे सगळे उघड्या डोळ्याने बघतच आहेत, असा टोमणाही यावेळी तुलियो डिसोझा यांनी मारला आहे. 

हेही वाचाः आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते जिवबा दळवींचा गौरव

या पुलावरील दोन मार्गिका आजही बंद स्थितीतच

८०० कोटी रुपये खर्चाच्या या मांडवी नदिवरील या तिसऱ्या पुलाच्या एकूण कामामध्ये राज्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी आपलं उखळ पांढरं करून घेतलं असून, या पुलाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार  आणि ‘कमिशनबाजी’ झाली असल्याचंही तुलियो डिसोझा यांनी यावेळी नमूद केलं. आपलं नाव पुलाच्या उद्घाटन फलकावर कोरलं जावं यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी पुलाचं घाईगडबडीत उद्घाटन केलं. दुर्दैवाची बाब म्हणजे आजतागायत हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा करण्यात आलेला नाही, या पुलावरील दोन मार्गिका आजही बंद स्थितीतच आहेत, असं डिसोझा म्हणाले. 

हेही वाचाः सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 1 जुलैपासून वाढणार?

हा पूल म्हणजे भाजपच्या भ्रष्ट राजवटीचं उत्तम उदाहरण

पुलाचं उद्घाटन झाल्यानंतर अवघ्या वर्षभरातच या पुलाला तडे गेले असून त्याचीही डागडुजी अद्याप झालेली नाही. पुलावरच्या रस्स्त्यांमध्ये आता खड्डेदेखील निर्माण झालेत. भरीसभर म्हणजे कंत्राटदाराने या पुलाखाली पडलेले काँक्रिटचे अवशेष अद्याप काढलेले नाहीत. हा पूल म्हणजे भाजपच्या भ्रष्ट राजवटीचं उत्तम उदाहरण आहे, असंही यावेळी डिसोझांनी सांगितलं.

हेही वाचाः दहा हजार नोकऱ्या दिल्यास महिना ४० कोटींचा भार 

या पुलाचं ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करा

आज पडलेल्या या विजेच्या खांबानंतर आता या पुलावरील इतर विजेचे खांब एकामागून एक पडून नागरिकांच्या, चालकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे राज्य सरकारने या पुलाचं ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करून नागरिकांना आश्वस्त करावं आणि सुरक्षेची उपाययोजना करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्यावतीने करत असल्याचे डिसोझांनी सांगितले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!