सत्तरीतल्या पोर्तुगीजकालीन ‘कादय’ दुर्लक्षीत, संवर्धनाबाबत सरकारी अनास्था

पोर्तुगिजांसोबतच्या संघर्षाची ही ज्वलंत प्रतीके; काही काळाच्या ओघात नामशेष

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी: पोर्तुगीजांनी गोमंतकावर साडेचारशे वर्ष राज्य केले. त्यांच्या जुलमी राजवटीत गोमंतकीयांचे अतोनात हाल करण्यात आले. या अत्याचाराविरुद्ध सत्तरीतील नागरिकांनी २५ ते ३० वेळा प्रखर झुंज दिली. त्यामुळे पोर्तुगीजांना या तालुक्यावर अधिक काळ शासन करता आलं नाही. सत्तरीतील स्वातंत्र्यसैनिकांना पकडून छळ करण्यासाठी पोर्तुगीजांनी तालुक्यात अनेक ठिकाणी ‘कादय’ अर्थात तुरुंगांची उभारणी केली होती. हे कादय म्हणजे सालाझारशाहीच्या अत्याचाराची साक्ष आहेत. भावी पिढीसाठी त्यांचे जतन होणं आवश्यक असताना केवळ सरकारी अनास्थेमुळे ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

हेही वाचाः १९९०मधील गुळेली ग्रामीण आरोग्य केंद्र सुस्थितीत; वाळपईतील नव्या हॉस्पिटलची इमारत धोकादायक

सत्तरी तालुका हा नव्या काबीजातीत मोडतो

पोर्तुगीज शासनाच्या साडेचारशे वर्षांच्या काळात गोव्यात जुन्या आणि नव्या काबीजाती (प्रदेश) असे दोन प्रकार अस्तित्वात होते. सत्तरी तालुका हा नव्या काबीजातीत मोडतो. आपण इतिहासाचा अभ्यास केला, तर या तालुक्यातील लोकांनी पोर्तुगीजांशी सर्वात प्रखर संघर्ष केल्याचं आढळतं. पोर्तुगीजांविरुद्ध सर्वांत जास्त म्हणजे २५ ते ३० वेळा सत्तरीतील लोकांनी मोठे बंड केले होते. प्रखर विरोधी कारवायांमुळेच सत्तरीवर सर्वांत कमी काळ सालाझारची राजवट राहिली. त्या काळातील असा प्रखर विरोध मोडून काढण्यासाठी पोर्तुगीजांनी सत्तरी तालुक्यात अनेक ठिकाणी कादय उभारले होते.

हेही वाचाः गवंडाळीत रेल्वे ओव्हरब्रीज पाहिजेच; लोकांची आग्रही मागणी

भिरोंडा, माळोलीतील कादय संकटात

काळाच्या ओघात आणि सरकारच्या अनास्थेमुळे रावण, कोदाळ या ठिकाणी असलेल्या कादय नामशेष झाल्या आहेत. सद्या भिरोंडा आणि माळोली या दोन ठिकाणच्या कादय अस्तित्वात आहेत. मात्र, त्या शेवटच्या घटिका मोजत आहेत. सरकारच्या पुरातत्त्व विभागाने तात्काळ माळोली आणि भिरोंडा या दोन्ही ठिकाणांवरील कादयांकडे लक्ष द्यावं. आताच त्यासाठी पावलं उचलली गेली नाहीत, तर भावी पिढी पोर्तुगीजांविरुद्धच्या प्रखर लढ्याच्या स्मारकांना मुकेल आणि खऱ्या अर्थाने आपण ज्वलंत इतिहासच मारून टाकू, अशी प्रतिक्रिया येथून व्यक्त होत आहेत.

स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची साक्ष असलेल्या कादय

पकडलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना कादयमध्ये पोर्तुगीज अक्षरशः जीवघेण्या यातना देत. त्यामुळे या कादय पोर्तुगीजांविरुद्धच्या संघर्षाची प्रतीके आहेत. ती भावी पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. दुर्देवाची गोष्ट म्हणजे या प्रतीकांचं संवर्धन करण्यासाठी सरकारकडून कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत. आता सत्तरीत काही मोजक्याच पोर्तुगीजकालीन कादयांचं अस्तित्व शाबूत आहे. मात्र, वेळीच त्यांच्या संवर्धनासाठी उपाययोजना केल्या नाहीत तर, कादयांचं उरलंसुरलं अस्तित्वही नामशेष होईल, यात अजिबात शंका नाही.

हेही वाचाः काँग्रेसच्या अग्रणी संघटना पक्ष मजबूत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजवणार

वारसास्थळांच्या जतनाबाबत सरकार गांभीर नाहीः प्रा. राजेंद्र केरकर, इतिहास अभ्यासक

सत्तरीतील पोर्तुगीजकालीन कादयची दुरुस्ती आणि डागडुजी झाल्यास त्याचा उपयोग इतिहास अभ्यासकांच्या पर्यटन वाढीच्या बाबतीत होऊ शकतो. या वास्तू सत्तरीतील स्वातंत्र्यसैनिकांनी पोर्तुगीजांविरुद्ध केलेल्या ऐतिहासिक बंडाची माहिती युवा पिढीपर्यंत पोचवण्याचं चांगलं साधन ठरू शकतात.

हेही वाचाः गोव्यात विवाहानंतरच्या हिंसेचे प्रमाण आठ टक्के

सरकारकडे पत्रव्यवहार करूनही काहीच फायदा नाहीः पॅट्रीसन आंद्राद, युवक, भिरोंडा

आमच्या गावातील कादय अतिशय वाईट स्थितीत आहे. ती केव्हाही कोसळू शकते. या कादयच्या संवर्धनासाठी आम्ही सरकारशी पत्रव्यवहार केले. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. या माध्यमातून मी पुन्हा एकदा सरकारच्या संबंधित खात्याकडे मागणी करतो की त्यांनी तात्काळ कादयच्या संवर्धनाचं काम हाती घ्यावं.  

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!