जनतेने पुन्हा भाजपवरील विश्वास दृढ केला

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; 5 पैकी 4 पालिकांवर विजय मिळाल्याने मानले गोंयकारांचे आभार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः भारतीय जनता पक्षाने 5 पैकी 4 पालिकांवर विजय मिळवून आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. या चारही पालिका यापूर्वी भाजपकडे होत्या. जनतेने पुन्हा भाजपवरील विश्वास दृढ केला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दिली. भाजपच्या मुख्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे,  उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, मंत्री मॉविन गुदिन्हो, माजी आमदार सुभाष फळदेसाई उपस्थित होते.

लोकसेवेसाठी पक्षाकडून रात्रंदिवस काम

भाजपला भरघोस मतांनी निवडून दिलेल्या लोकांचे मी आभार मानतो. राज्यातील दोन्ही जिल्हा पंचायती आणि दोन पालिका वगळता सर्व पालिका आणि एका महानगर पालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळेल आणि पुन्हा आमची सत्ता येईल. पालिका आणि जिल्हा पंचायत निवडणुकांमध्ये मिळालेलं यश हे पुढील विधानसभेच्या यशाची पहिली पायरी आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट – तानावडे आणि पक्षाचे संघटन अहोरात्र काम करत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या सेवेसाठी पक्ष रात्रंदिवस काम करत असल्याचं मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

सर्वांनी मिळून कोरोनाविरुद्ध लढायला हवं

राज्यात कोरोनाचे रुग्ण दगावण्याची संख्या वाढली आहे आणि ही बाब अत्यंत गंभीर आहे. सरकार, आरोग्य खाते, आपत्कालीन व्यवस्थापन, पोलिस, अग्निशामक आदी सर्व यंत्रणा आपापल्या परीने कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लोकांनीही आता याकडे गंभीरपणे पाहण्याची वेळ आली आहे. सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर आणि मास्क परिधान या गोष्टी कटाक्षाने पालन करायला हवं. सरकार असो, विरोधक असो किंवा लोक, आपण सर्वांनी मिळून कोरोना विरुद्ध लढायला हवं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.

हेही वाचाः मडगाव पालिकेत गोवा फॉरवर्ड, काँग्रेस पॅनलची सत्ता

लॉकडाऊन केल्यास राज्याची अर्थव्यवस्था कोलमडणार

परराज्यातून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. मी व्यक्तीशः यावर लक्ष ठेवून आहे. आपल्या राज्यातच कोरोनाचा फैलाव असल्याने आपल्याला सजग राहण्याची आवश्यकता आहे, असं आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी केलं. राज्यात कोरोना वाढत असला तरी सरकारचा लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नाही. कोरोनाचे नियम पाळून उद्योग व्यवसाय सुरू ठेवणं गरजेचं आहे. संपूर्ण लॉकडाऊन केल्यास राज्याची अर्थव्यवस्था पुन्हा कोलमडून पडेल. तसंच राज्यातील औषध कंपन्या बंद राहिल्या तर केवळ राज्य नव्हे, तर देशातील औषध व्यवसायावर विपरित परिणाम होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचाः COVID HEALPLINE | गोवा प्रदेश युवा कॉंग्रेसची 24×7 कोविड हेल्पलाईन

चांगल्या सूचनांचं सरकारकडून स्वागत

विरोधकांनी केवळ टीका करण्याऐवजी सरकारला सल्ला द्यावा. योग्य आणि चांगल्या सूचनांचं सरकार स्वागतच करेल. लोकांनीही सरकारला योग्य सूचना केल्यास त्या आम्ही स्वीकारू, असे मंत्री मॉविन म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!