न्हंयबाग येथे ओमनी कार नदीत बुडाली

मकबूल | प्रतिनिधी
पेडणेः शुक्रवारी सकाळी न्हंयबाग येथे एक विचित्र प्रकार घडलाय. पार्क केलेली कार कुणीतरी मुद्दाम नदीत ढकललीये. कार नदीत कुणी ढकलली? का ढकलली? कधी ढकलली? हे सगळे प्रश्न अनुत्तरीतच आहेत. मात्र स्थानिकांचा दृष्टीस नदीत बुडणारी कार पडताच तातडीने धावपळ करून ती सुरक्षित पाण्याबाहेर काढण्यात आली असल्याचं समजतंय.

नक्की काय आहे प्रकार?
शुक्रवारी सकाळी 10.30 च्या दरम्यान न्हंयबाग येथे हा प्रकार घडला. तुकाराम कुडव यांच्या मालकीची मारुती ओमनी कार (जीए-01-एस -6649) न्हंयबाग येथे नदीत बुडताना स्थानिकांच्या दृष्टीस पडली. आश्चर्य म्हणजे कार नदीत बुडत होती, मात्र त्याच्या आत कुणीच नव्हतं. त्यामुळे हा प्रकार कुणीतरी मुद्दाम केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. कारमध्ये कुणीच नसल्याने सुदैवाने या प्रकारात जीवितहानी झालेली नाही.
हेही वाचाः विवाहपूर्व काऊन्सिलिंगचा प्रस्ताव सरकारनं गुंडाळला
धावपळ करून कार काढली बाहेर
कार नदीत बुडताना दिसताच स्थानिक एकनाथ तेली यांनी फोन करून अग्निशामक दलाला सदर घटनेची माहिती दिली. अग्निशामक दलाचे जवान वेळ न दडवता घटनास्थळी दाखल झाले. आधुनिक दोरीचा वापर करून त्यांनी कार सुखरूपपणे पाण्यातून वर काढली आणि मालकाच्या ताब्यात दिली. या कामात अग्निशामक दलाचे जवान प्रदीप असोलकर, चालक प्रशांत देसाई, जवान अमित सावळ, जवान लक्षदीप हरमलकर यांनी चांगली कामगिरी केली.
