राज्यात व्यसनाधीन होणाऱ्यांची संख्या वाढली!

राष्ट्रीय सर्व्हेक्षण अहवालातून स्पष्ट; जनजागृतीसाठी चळवळ राबवणं गरजेचं

नारायण गवस | प्रतिनिधी

पणजी: साक्षरतेमध्ये देशात अग्रेसर असलेल्या गोव्यात व्यसनाधीन होणाऱ्यांचं प्रमाण वाढल्याचं २०१९-२०२० च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे. ही सरकारी आकडेवारी असून प्रत्यक्षात हे प्रमाण अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तंबाखूजन्य पदार्थांबरोबरच मद्यपानाचेही व्यसन जडल्याचं सर्व्हेक्षणात आढळून आलं आहे. त्यामुळे राज्यात वेळीच व्यसनमुक्ती चळवळ राबवणं, काळाची गरज बनली आहे.

सरकारी पातळीवरून आरोग्य खात्याकडून वेळोवेळी जनजागृती

गोव्यातील जनता व्यसनापासून दूर रहावी, यासाठी सरकारी पातळीवरून आरोग्य खात्याकडून वेळोवेळी जनजागृती केली जाते. तरी त्याला अपेक्षित यश येत नसल्याचं दिसून येतं. कारण दिवसेंदिवस नागरिक व्यसनाच्या दिशेने वळत आहेत. तंबाखूजन्य पदार्थ, सिगारेट यांसारख्या उत्तेजित करणाऱ्या पदार्थांचं व्यसन तर वाढत आहेच. शिवाय मद्यपींची संख्याही वाढत आहे. भरीस भर म्हणून पुरुषांसोबत राज्यातील महिलाही व्यसनाच्या आहारी जाऊ लागल्याचं सर्व्हेक्षणात आढळून आल्यानं ही चिंतेची बाब ठरली आहे.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षणानुसार…

– राज्यात १५ वर्षांवरील १८.२० टक्के पुरुषांना तंबाखूजन्य पदार्थांचं व्यसन जडलं आहे. यात शहरी भागातील १९.५ टक्के तर ग्रामीण भागात १६.३ टक्के पुरुषांचा समावेश आहे. ही टक्केवारी पाहता शहरी भागातील पुरुषांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन जास्त असल्याचं स्पष्ट होतं.
– १५ वर्षांवरील २.६ टक्के महिला या तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी गेल्या आहेत. शहरी भागात याचे प्रमाण २.४ टक्के तर, ग्रामीण भागात याचं प्रमाण २.८ टक्के आहे. ही टक्केवारी पाहता ग्रामीण भागातील महिलांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांचं व्यसन जास्त असल्याचं स्पष्ट होतं.
– राज्यात १५ वर्षांवरील ३६.९ टक्के पुरुष दारूच्या आहारी गेले आहेत. शहरी भागात याचं प्रमाण ३८.२ टक्के तर, ग्रामीण भागात याचं प्रमाण ३४.९ टक्के आहे. म्हणजे राज्यातील सुमारे ३६.९ टक्के पुरुषांना दारूचं व्यसन जडल्याचं स्पष्ट होतं.
– १५ वर्षांवरील ५.५ टक्के महिलांना दारूचे व्यसन जडलं आहे. शहरी भागात याचं प्रमाण ५.६ टक्के तर, ग्रामीण भागात याचं प्रमाण ५.३ टक्के आहे. म्हणजे शहरी आणि ग्रामीण भागातील ही टक्केवारी जवळजवळ समान आहे.

व्यसनं जडण्याची मुख्य कारणं…

– राज्यातील साक्षरतेचा दर वाढत असताना शैक्षणिक पात्रतेनुसार युवकांना रोजगार, नोकऱ्या उपलब्ध होत नाही. शिक्षण आणि नोकऱ्या किंवा रोजगार यांच्यात सुसूत्रता नसल्यानं बेरोजगारीचा दर वाढला आहे. यामुळे अनेकजण निराशेच्या छायेत आहेत. या निराशेतून ते सहज व्यसनाधीनतेकडे वळत आहेत.
– बेरोजगारीबरोबरच कौटुंबिक वाद, आर्थिक समस्या, व्यवसायात येणारं अपयश, दैनंदिन स्पर्धात्मक जीवनातील धावपळ, ताण तणाव यामुळेही लोक व्यसनाधीनतेकडे वळत आहे. काही प्रकरणांमध्ये कमी वयात गरजेपेक्षा जास्त मिळकत होणारेही व्यसनाच्या आहारी जात आहेत, असं तज्ज्ञांकडून समजतं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!