CRIME | अपहरण करणारी टोळी गजाआड

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : कॅनडाला नोकरीसाठी पाठवण्याच्या बहाण्याने तरुणांची आर्थिक फसवणूक व अपहरण करून त्यांच्याकडून खंडणी मागणाऱ्या टोळीचा गोवा पोलिसांनी शनिवारी पर्दाफाश केला. टोळीतील बारा जणांना अटक करण्यात आली असून, एका अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतलं आहे. तर अपहरण करून पर्वरी येथील भाड्याच्या बंगल्यात डांबलेल्या दोन व्यक्तींची सुखरूपपणे सुटका केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
११ फेब्रुवारीला गोवा पोलिसांत नोंदवली तक्रार
शपूर शरीफी या होणाऱ्या पतीचे गोव्यात अपहरण झाल्याची तक्रार एका तरुणीने ११ फेब्रुवारी रोजी गोवा पोलिसांत नोंदवली होती. होणारा पती रोजगारासाठी कॅनडाला गेल्याचा संदेश मला मिळाला आहे, पण त्यावर आपला विश्वास नाही. त्याचं गोव्यात अपहरण झाल्याचा दावा तक्रारदार तरुणीने केला होता. तरुणीच्या तक्रारीनुसार, गुन्हा शाखेचे अधीक्षक शोभित सक्सेना व दक्षिण गोवा अधीक्षक पंकज कुमार सिंग यांच्या नेतृत्वाखाली वास्को पोलिस, दहशतवादविरोधी पथक, गुन्हा शाखा व पेडणे पोलिसांची पथके तयार करण्यात आली होती. पोलिस महासंचालक, महानिरीक्षकही या प्रकरणावर लक्ष ठेवून होते. दरम्यान, पोलिसांच्या पथकाने शोध मोहीम जारी करत या टोळीचा शोध घेतला.
हेही वाचाः भीषण! तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट
१२ संशयितांना अटक
पोलिसांनी टोळीतील मुख्य संशयित सुशील सिंग उर्फ ऋषभ (३५, हरयाणा), आलेक्स डिसोझा (२९, पेडणे), रॉबिन्सन डिसोझा (२३, पेडणे), आशिष त्रिपाठी (३०, गोरखपूर – उत्तर प्रदेश) तसंच हरयाणातील रजत कल्याण (२३), साहील कल्याण (२४), प्रदीप कुमार (३२), संजू सिंग (२८), विजय (२६), अनिल कुमार (३६), अनुराग कुमार (१८) व विशाल गोस्वामी (२०) यांना अटक केली. तर एका १६ वर्षीय अल्पवयीनास ताब्यात घेण्यात आलं आहे.
गोव्यात बोलावून केलं अपहरण
मुख्य संशयित सुशील सिंग याने शपूर झरीफीला कॅनडाला जाण्यासाठीची कागदपत्रे तयार असल्याचं सांगत ७ फेब्रुवारी रोजी गोव्यात बोलावलं. त्याच्याकडून आगाऊ दोन लाख रुपये घेतले व त्याचं अपहरण करून त्याला पर्वरीतील भाड्याच्या घरात डांबून ठेवलं. त्यानंतर त्याला त्याच्या मित्रांशी अफगाणी भाषेत संपर्क साधायला लावून कॅनडाला जाण्यासाठी २० हजार डॉलर्सची मागणी करायला लावली. दरम्यान, संशयितांच्या टोळीने शपूरचा दिल्ली ते टोरंटो प्रवासासाठी पासपोर्ट आणि एअर इंडियाचा बोर्डिंग पासही तयार केला होता. पण तपासणी दरम्यान पासपोर्ट व बोर्डिंग पास बनावट असल्याचं तपासात उघड झालं.
पंजाबातील युवकाचंही केलं होतं अपहरण
संशयितांची टोळी तरुणांचं गोव्यात अपहरण करायची आणि ते तरुण कॅनडाला नोकरीला गेल्याचं त्यांच्या कुटुंबीयांना वॉट्सअप कॉलमार्फत भासवायचे. त्यांच्या कुटुंबीयांकडून पूर्ण रक्कम मागायचे. अशाचप्रकारे अपहरण केलेल्या पंजाबमधील युवकाचीही पर्वरीतील बंगल्यातून सुटका करण्यात आली आहे.
हेही वाचाः सविस्तर | आपल्या मुलांचा जीव मोबाईलच्या किंमतीएवढा झालाय का?