कासारवर्णे कालवा फुटून रस्त्यावर पाणीच पाणी

दुचाकी वाहनांची उडाली धांदल; शेकडो लिटर पाण्याची नासाडी

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः कासारवर्णे पेडणे येथील तिळारी कालवा फुटल्याने मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी झालंय. या रस्त्यावरून वाहनं काढताना चालकांची बरीच धांदल उडालीये. दुचाकी वाहने घेऊन जाताना बऱ्याच अडचणी येतायत, अशी माहिती जागृत युवक साहिल नारूलकर यांनी दिलीये.

रस्त्यावर पाणीच पाणी

हा कालवा रस्त्याच्या वरच्या बाजूला आहे. त्याची वेळेवर दुरुस्ती केली नसल्यानं त्याला मोठं भगदाड पडलं आणि या कालव्यातून येणारं पाणी डोंगर भागातून, काजू बागायातीतून, मिळेल तिथून वाट काढत सकाळी 9 वा. मुख्य रस्त्यावर यायला सुरुवात झाली. सकाळी 11 पर्यंत हळुहळू हे पाणी मोठ्या प्रमाणात वाढलं. त्यात वाहनांना रस्त्यावरून मार्ग काढणं कठीण होऊ लागलं. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे रस्त्यावरून जाणारे वाहनचालक, नागरिक भयभीत झालेत.

मामलेदारांना दिली कल्पना

या विषयी कासारवर्णे सरपंच पांडुरंग पार्सेकर यांच्याकडे संपर्क साधला असता ते म्हणाले, संपूर्ण रस्त्यावर चिखल झाला आहे. वाहन हाकणं कठीण बनलंय. स्थानिक पंचायत, तलाठी समीर धुरी यांनाही कळवलंय. त्यांनी मामलेदारांना या प्रकाराची कल्पना दिली असल्याचं सांगितलं.

त्वरित तोडगा काढण्याची विनंती

मी या घटनेची माहिती लगेचच पेडणेचे उपजिल्हाधिकारी रविशेखर निपाणीकर यांना दिली. तसंच मामलेदार अनंत मळीक आणि जलसिंचन विभागाच्या कानावर घडला प्रकार घातलाय. तसंच यावर त्वरित तोडगा काढण्याची विनंही केली असल्याचं पेडणे भाजप मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस यांनी सांगितलं.

आपत्कालीन विभागाशी उपमुख्यमंत्र्यांनी केला संपर्क

कासारवर्णे रस्त्यावर अचानक डोंगर माळरानातून चिखलमय पाणी आल्याने लोक घाबरले. काही स्थानिकांनी आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकरांकडे संपर्क साधून घडल्या प्रकाराची माहिती दिली. उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने आपत्कालीन सेवेकडे संपर्क करून तातडीने मदत कार्य सुरू करायची सूचना दिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!