राज्यातील टुरिस्ट टॅक्सिवाल्यांचा विषय तापला

टॅक्सी आंदोलकांना आझाद मैदानावर प्रवेश नाकारला; वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी केला विरोध

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजीः राज्यात एकीकडे कोरोनाचा संचार वाढत चाललाय. मृत्यूदरही धोक्याची पातळी ओलांडू लागलाय. अशा परिस्थितीतच सरकारवर दबाव आणण्यासाठी राज्यातील टुरिस्ट टॅक्सिवाल्यांनी आझाद मैदानावर गेले दहा दिवस ठाण मांडून आंदोलन चालवलंय. सरकारकडून चर्चेचे आमंत्रण पाठवलं जात असलं तरी आझाद मैदानावर या आणि चर्चा करा, असा हट्ट आंदोलकांनी धरलाय. आता तर आपल्या कुटुंबियांसह ते आंदोलनात सहभागी झालेत. गोवा माईल्स अ‍ॅप  सेवा बंद करा, अशी एकमुखी मागणी ते करताहेत. सरकार मात्र ही मागणी मान्य करायला तयार नाही.

हेही वाचाः टुरिस्ट टॅक्सीच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू – मुख्यमंत्री

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकत्र जमण्यास केला अटकाव

या एकूणच परिस्थितीत कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे हे आंदोलन हॉटस्पॉट ठरण्याचीच अधिक शक्यता निर्माण झाल्याने उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी आंदोलकांना आझाद मैदानावर एकत्र जमण्यास अटकाव केलाय. आझाद मैदानावर एकत्र जमण्यास अटकाव केलाय खरा, पण आता हेच आंदोलक रस्त्यावर एकत्र जमले असून शेवटी कोरोना मार्गदर्शक तत्वाचं उल्लंघन तर होतच असून यातून प्रसार थांबविण्यासाठी कुणीच प्रयत्न करीत नसल्याचे दुर्दैवी चित्र पाहायला मिळतंय.

भाजपचे कुणीच काय नाही येत ?

टुरिस्ट टॅक्सिवाल्यांच्या आंदोलन ठिकाणी गेले दहा दिवस सगळे भेट देऊन गेले. विरोधकांनी तर मोठ मोठी भाषणे ठोकून टाळ्याही मिळवल्या. आरजीचे मनोज परब यांनी येऊन उजो पेटवला. सध्या हे आंदोलन नेतृत्वहीन बनलंय. तिथे सगळेच नेते बनलेत आणि त्यामुळे कुणीही मध्यस्ती करण्यास धजावत नाहीए. टॅक्सिवाले हे आक्रमक आणि त्यात ते मोठ्या संख्येने असल्यामुळे आपल्या पायावर धोंडा मारून घेण्याचं धाडस या परिस्थितीत कुणीही राजकीय नेता करणार नाही, अशीच परिस्थिती आहे. वास्तविक भाजपचा एखादा पदाधिकारी किंवा नेता इथे येऊन त्यांचं म्हणणं ऐकून गेला असता, तर बरं झालं असतं. भाजपच्या कुणीच याठिकाणी तोंड दाखवलं नाही.

हा व्हिडिओ पहाः Video | Exclusive | सलग आठव्या दिवशीही आंदोलन सुरुच, टॅक्सीचालकांचं बायका-मुलांसह आंदोलन

मायकल लोबोंकडून टॅक्सिवाल्यांच्या भूमिकेचं समर्थन

कळंगुटचे आमदार मायकल लोबो हे पूर्णपणे टॅक्सिवाल्यांच्या भूमिकेचं समर्थन करतात. त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही गोष्ट सांगितलीदेखील. परंतु त्यांनाही आंदोलनाच्या ठिकाणी जाण्यास पक्षाने मज्जाव केलाय. वाहतूकमंत्री मॉविन गुदीन्हो यांनीही ताठर भूमिका घेत मंगळवारी टॅक्सिवाल्यांना चर्चेसाठी पाचारणं केलंय. या चर्चेला जाण्यास आंदोलक तयार नाहीत. इथे येऊनच चर्चा करा, असा हट्ट त्यांनी धरलाय. या हट्टीपणामुळे सर्वसामान्य जनतेचीही या आंदोलनाला सहानुभूती मिळताना दिसत नाही. सगळे प्रश्न चर्चेतून सोडवता येतात. टॅक्सीवाल्यांचे खरोखरच प्रामाणिक विषय असतील तर ते योग्य पद्धतीनं सरकारसमोर मांडण्याची गरज आहे. आता सरकार जाणीवपूर्वक या गोष्टींकडे दुर्लक्ष करीत असेल तर मात्र सरकारला दोष देता येईल. सध्याच्या टॅक्सिवाल्यांच्या भूमिकेचं समर्थन कुणीही करू शकत नाही हे ते समजूनच घेत नाहीएत.

हेही वाचाः गोवा माईल्सचा निर्णय घेताना पर्रीकरांनी विश्वासात घेतलं नाही- मायकल लोबो

ताम्हणकरांचा प्रस्तावच योग्य होता

खाजगी बस मालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी एक चांगला प्रस्ताव टॅक्सिव्यवसायिकांच्या आंदोलकांसमोर मांडला होता. सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमावी. या समितीला कालबद्धतेने हा विषय सोडविण्याचे आदेश सरकारने द्यावेत. आंदोलकांना आपलं म्हणणं आणि विशेष करून गोवा माईल्स सेवेसंबंधीच्या तक्रारी आणि मुद्दे या समितीसमोर मांडण्याची संधी मिळावी. या मुद्दांचा अभ्यास करून समितीने निर्णय घ्यावा. हा निर्णय आंदोलकांनी मान्य करावा. समजा हा निर्णय राजकीय दबावाने किंवा कुणाच्या तरी भल्यासाठी चुकीच्या पद्धतीनं घेतला जात असेल, तर मग या निर्णयाला अधिकृत पद्धतीने न्यायालयात आव्हान देऊन तिथे न्यायासाठी लढता येणं शक्य आहे. ताम्हणकरांच्या या प्रस्तावालाही टॅक्सिवाल्यांनी विशेष पसंती दर्शवली नसल्याने आता हे आंदोलन पूर्णपणे दिशाहीन बनत चाललंय.

आंदोलन कुंभमेळा ठरू नये

हरिद्वार येथे कुंभमेळ्यात जसे कोरोना रूग्ण सापडले तशी परिस्थिती टॅक्सिवाल्यांच्या आंदोलनाची होऊ नये, अशी भीती व्यक्त केली जात आहे. टॅक्सिवाल्यांनी आपल्या बायका, मुलांनाही आझाद मैदानावर बोलावलंय. याठिकाणी कोरोना विषाणूंचा प्रसार झाला, तर मात्र अनेक टॅक्सी व्यवसायिकांच्या कुटुंबियांसमोर भीषण संकट ओढवण्याची शक्यता आहे. या विषयाबाबत सरकारने गांभिर्याने विचार करावा. टॅक्सी व्यवसायिकांशी संबंधीत वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन या टॅक्सिवाल्यांची समजूत काढून योग्य पद्धतीनं हा विषय सोडवावा, अशी मागणी सर्वसामान्य गोंयकारांची आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!