पल्लवी भगतांचा अपमान हा संपूर्ण महिला वर्गाचा अपमान

महिला काँग्रेसच्या अध्यक्ष बिना नाईक यांची टीका; दामू नाईकांनी भाजपची महिला विरोधी संस्कृती दाखवली म्हणत लगावला टोला

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव: काँग्रेस पक्षाने नेहमीच महिलांना मानाचं स्थान दिलं असून समाजात महिलांना पुढे आणण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत. काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या पल्लवी भगत यांच्यावर बेजबाबदार असा आरोप करुन भाजपचे सरचिटणीस दामू नाईक यांनी भाजपची महिला विरोधी संस्कृती दाखवली आहे, असा सणसणीत टोला महिला काँग्रेसच्या अध्यक्ष बिना नाईक यांनी लगावला आहे. गुरुवारी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दामू नाईक यांनी काँग्रेस प्रवक्त्या पल्लवी भगत यांना त्यांनी जारी केलेले पत्रक इतरांनी लेखी स्वरुपात दिलं होतं का, असा आरोप केला होता. तसंच पल्लवी भगत यांना राजकारणाचं ज्ञान आहे का? असा प्रश्न विचारला होता. त्यांचा समाचार घेताना बिना नाईक यांनी भाजपला फैलावर घेतलं.

हेही वाचाः वास्को अमर नाईक खून प्रकरण: दोन संशयितांना अटक

संपूर्ण महिला वर्गाचा अपमान

भाजप सरचिटणीस दामू नाईक यांनी पल्लवी भगत यांना ‘तथाकथित प्रवक्त्या’ असं संबोधून केवळ त्यांचाच नव्हे, तर संपूर्ण महिला वर्गाचा अपमान केला आहे. महिलांना अज्ञानी, मागास आणि अडाणी समजण्याच्या भाजपच्या मनोवृत्तीचं प्रदर्शन दामू नाईक यांनी केलं आहे, असं बिना नाईक यांनी म्हटलंय. भाजपचे सरचिटणीस दामू नाईक यांनी त्वरित पल्लवी भगत आणि सर्व महिलांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी नाईक यांनी केली आहे.

हेही वाचाः नवा ‘ड्रोन नियम मसुदा’ जारी

… तर आज जनता सुखी झाली असती

भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांच्यावर केलेले आरोप धादांत खोटे होते हे पल्लवी भगत यांनी उघड केल्यानंच दामू नाईक यांनी सारवासारव करण्यासाठी लगेच पत्रकार परिषद घेतली. भाजपवाल्यानी हीच तत्परता कोविड महामारीचे गैरव्यवस्थापन, वाढती गुन्हेगारी, किनारी व्यवस्थापन आराखडा, कोळसा हब, पर्यावरण नष्ट करणारे प्रकल्प, म्हादई, शैक्षणिक गैरव्यवस्थापन, कोसळलेली अर्थव्यवस्था यावर सरकारची कान उघाडणी करण्यात दाखविली असती, तर आज जनता सुखी झाली असती, असं नाईक यांनी म्हटलंय.

हेही वाचाः पणजी शहरातील रस्त्यांची दयनीय स्थिती

पर्रीकरांच्या राजकीय कर्माची फळं त्यांचे वारसदार भोगणार

माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचा वारसदार म्हणूनच विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुत्रे हातात घेतली होती. त्यामुळे पर्रीकरांच्या राजकीय कर्माची फळं त्यांना तसंच भाजपवाले आणि पर्रीकरांचा वारसा पुढे नेण्यास सांगणाऱ्यांना भोगावीच लागतील. गोवा लोकायुक्तांनी २१ भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करण्याचे जे आदेश दिले आहेत, त्यातील बहुतेक प्रकरणं स्व. पर्रीकरांच्या कारकीर्दीतली आहेत, याकडे नाईक यांनी लक्ष वेधलं.

हेही वाचाः उच्च शिक्षणासाठी नम्रताला होईल ती सगळी मदत करणार

केवळ आपल्या राजकीय फायद्यासाठी स्व. मनोहर पर्रीकरांचा वारसा सांगणाऱ्यांनी त्यांचं सुडाचं राजकारण, हेकेखोरपणा आणि गोव्याचा खाण व्यवसाय बंद पाडण्याचा घेतलेला एकतर्फी निर्णय यावर ही उघड भूमीका मांडणं गरजेचं आहे, असं नाईक म्हणाल्या.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!